
चेन पुलिंगमुळे गोदान एक्स्प्रेस खोळंबली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेवरील मुंबई-गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन पुलिंग केल्याने गुरुवारी टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान काळू नदीच्या पुलावर एक्स्प्रेस खोळंबून राहिली. या वेळी प्रसंगावधान दाखवून मध्य रेल्वेचे सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीच्या पुलावर उतरून, एक्स्प्रेसखाली जाऊन गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन रिसेट केली. त्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
आपत्कालीन परिस्थिती रेल्वे गाडी थांबविण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध आहे. मात्र, प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी क्षुल्लक कारणांसाठी करतात, असे निदर्शनात येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावरच मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. याशिवाय प्रवाशांचीही गैरसोय होते. गुरुवारी, दुपारच्या सुमारास गाडी क्रमांक ११०५९ गोदान एक्स्प्रेसमधील अज्ञान प्रवाशाने अचानक अलार्म चेन पुलिंग केल्याने टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान काळू नदीच्या पुलावर गोदान एक्स्प्रेस थांबली होती. त्यामुळे मागून येणाऱ्या रेल्वे गाड्या काही काळासाठी खोळंबल्या. यादरम्यान सहायक लोको पायलट सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक्स्प्रेसची अलार्म चेन रीसेट केली. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
१५ दिवसांत १९७ चेन पुलिंगच्या घटना
१६ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १९७ चेन पुलिंगच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चेन पुलिंगच्या घटना उत्तर प्रदेशात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांत घडली आहे. अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराची १६६ प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामध्ये ११३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५६ हजार ५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06106 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..