
रशिया-यक्रेन युद्धाचा मलजल केंद्रावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : युक्रेन-रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम सिमेंट आणि स्टील उत्पादनावर झाला आहे. याचा फटका मुंबई महापालिका उभारत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्र म्हणजेच एसटीपी प्लांटला बसत असून त्याच्या किमतीत साधारणतः २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
महापालिकेकडून मुंबईत सात एसटीपी प्लांट उभारण्यात येत आहेत. त्यातील वरळी (५०० एमएलडी), वांद्रे (३६० एमएलडी), मालाड (४५४ एमएलडी), घाटकोपर (३३७ एमएलडी), धारावी (४१८ एमएलडी), भांडुप (२१५ एमएलडी), वर्सोवा (१८०) या सात ठिकाणी सीवरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात येत आहेत. एसटीपी प्लांटच्या बांधकामांवर साधारणतः १६,४१२ कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे. महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाचा खर्च २०२०च्या अंदाजापेक्षा २२ टक्के जास्त आहे. यात प्रतिवर्षी सुमारे ११ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
मालाडच्या एसटीपी प्रकल्पासाठी २०२० मध्ये जमीन पुनर्संचयित करण्याच्या समस्या होत्या. त्या आता सोडवण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पालिकेने फेब्रुवारी ते एप्रिल २०११ दरम्यान निविदा प्रक्रिया राबवली. धारावीसाठी ३, वांद्रेसाठी ३, वर्सोव्यासाठी ४, घाटकोपरसाठी ३, वरळीसाठी २, मालाडसाठी २ आणि भांडुपसाठी ७ निविदाकारांचा प्रतिसाद मिळाला. सर्वात कमी बोली लावणाऱ्या पात्र अर्जदाराला निविदा देण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले असून स्वतः सर्वोच्च न्यायालय एसटीपी प्लांटच्या कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणार आहेत.
.......
सर्वात मोठे मलजल केंद्र
देशात पहिल्यांदाच ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन ते ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतक्या आकाराचे मलजल प्रक्रिया केंद्र बांधण्याचे काम होणार आहे. आजवरचा विचार करता देशभरात बांधण्यात आलेले मलजल प्रक्रिया केंद्र हे ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन ते १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन या क्षमतेदरम्यानचे आहेत.
.......
६४ टक्के पाण्यावर प्रक्रिया
नियोजित प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर २.४६४ दशलक्ष लिटर प्रतिदिन मलजलावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर होऊ शकेल; तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याची समस्यादेखील सुटेल. महापालिका क्षेत्रामध्ये आजघडीला ३ हजार ८५० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचा वापर होत असून त्या तुलनेत सुमारे ६४ टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया होईल.
.....
प्रकल्पांची निश्चित झालेली किंमत ही सन २०२० मधील अंदाजांच्या तुलनेत २२ टक्के अधिक आहे. कोविड संसर्ग, सिमेंट व स्टील दरात झालेली मोठी वाढ, तसेच युक्रेन -रशिया युद्ध यामुळे ही वाढ झाली आहे. प्रतिवर्ष ११ टक्के वाढ असून समाजण्याजोगी आहे.
- इक्बाल सिंह चहल, आयुक्त, महापालिका.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06122 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..