
कोकण विभागात २७०० कोटींची थकबाकी
मुंबई, ता. ७ : महावितरणच्या कोकण विभागातील वीज ग्राहकांनी सुमारे २७०० कोटी रुपयांचे वीजबिल थकवले आहे. त्यामुळे वीजग्राहकांकडून दरमहा वीजबिले भरून घ्यावीत; अन्यथा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करावा, असे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या मंडल कार्यालयांच्या अधीक्षक अभियंत्यांची आढावा बैठक भांडुप परिमंडल कार्यालयात झाली.
डांगे म्हणाले, की कोकण प्रादेशिक विभागाच्या वीजबिल वसुलीत मार्चनंतर शिथिलता आली आहे. परिणामी एप्रिल महिन्याचे चालू वीजबिलही पूर्णपणे वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे महिन्याच्या १ तारखेपासूनच चालू वीजबिल आणि थकबाकी वसुलीच्या कामाला गती द्यावी, तसेच वारंवार आवाहन करूनही बिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
---
अभय योजनेला प्रोत्साहन द्या!
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना नवसंजीवनी ठरू शकणाऱ्या विलासराव देशमुख अभय योजनेतून सवलत द्यावी व सन्मानाने वीजवापर करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे. मीटर रीडिंग एजन्सीकडून आलेल्या रीडिंगमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06125 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..