
स्टेनोच्या बदल्यांवरून कर्मचारी संघटनांमध्ये वाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : शासनाच्या बदली धोरणानुसार ३१ मे पर्यंत सर्वच विभागाला सर्वसाधारण बदल्या करायच्या आहेत. राज्य परिवहन विभागातसुद्धा आरटीओ पातळीवर बदलीचे वारे वाहत आहेत. मात्र आरटीओच्या स्टेनो पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादीच अद्याप तयार नाही. तसेच एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बदल्यांना विरोध होत आहे. त्यांनी परिवहन आयुक्तांना पत्र पाठवून बदल्यांना विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर कर्मचाऱ्यांकडून मात्र स्टेनो पदाच्या बदल्या व्हायला पाहिजे, असा आग्रह केला जात आहे.
आरटीओतील विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या सध्या सुरू आहेत. बदलीचे अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना आहेत. प्रत्यक्षात समुपदेशन करून या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे आवश्यक आहे. मात्र समुपदेशन न करताच बदल्या केल्या जात आहेत. अडचणीच्या ठिकाणी बदल्या देऊन कर्मचाऱ्यांना वेठीस धरत असल्याचेही अनेक कर्मचारी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगत आहेत. विशेष म्हणजे आरटीओ अधिकाऱ्यांचे स्टेनो या वेळी तरी बदलतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वर्षानुवर्षे एकच टेबल सांभाळत हितसंबंध तयार झाल्यामुळे येथे गैरप्रकार झाल्याच्या घटनासुद्धा यापूर्वी घडल्या आहेत. मात्र त्यानंतरही अद्याप स्टेनोच्या बदल्या प्रलंबितच आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06131 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..