
‘ग्रीन बस थांब्यां’चा कोटींचा घाट!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईतील बेस्ट बस थांब्याचे ‘ग्रीन बस स्टॉप’मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. यासाठी २५० कोटी रुपये खर्च केला जात आहे. बेस्ट प्रशासन आर्थिक अडचणीत असताना, शिवाय बस थांबेही सुस्थितीत असताना शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई उपनगरातील एकूण ३०० बेस्ट बस थांब्यांचे सौंदर्य पालटण्यात येणार आहे. यासाठी सहायक महापालिका आयुक्त (नियोजन) यांनी दोन वेगळ्या निविदादेखील काढल्या आहेत; मात्र या दोन निविदा प्रक्रियांमध्ये प्रत्येक बस थांब्याच्या मूल्यामध्ये मोठा फरक आहे. २०० बस थांब्यांसाठी काढलेल्या पहिल्या निविदेमध्ये प्रत्येक बस थांब्याचे अंदाजे मूल्य ८.७४ लाख दाखवण्यात आले आहे, तर १०० बस थांब्यांसाठी काढलेल्या दुसऱ्या निविदेत प्रत्येक बस थांब्याची किमत ९.०१ लाख ठरवण्यात आली आहे. त्यात २७ हजार रुपयांचा फरक आहे.
निविदेनुसार प्रत्येक बस थांब्याची किंमत प्रचंड वाढलेली दाखवण्यात आली. अशा प्रकारचे बस थांबे निम्म्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध व्हायला हवेत. बेस्ट प्रशासन आर्थिक गर्तेत असतानादेखील हा अवाजवी खर्च का, असा प्रश्न विचारला जात आहे. बेस्ट प्रशासनाची आर्थिक स्थिती खराब असताना हा खर्च बससेवा सुधारण्यासाठी करायला हवा. विशेषत: बेस्ट बसचा ताफा जुना झाला आहे. त्यामुळे बस थांबे बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यात खर्च केला जाणारा २६ कोटी रुपयांचा निधी वापरून अधिक नवीन बस खरेदी करता येऊ शकतात. याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
निविदा सूचना रद्द करा
बेस्ट आणि पालिका प्रशासनाची संपूर्ण मुंबईत सुमारे तीन हजार बस थांबे उभारण्याची योजना आहे. उर्वरित २७०० बस थांब्यांची एकूण किंमत २४३ कोटी रुपये आहे. या माध्यमातून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. बेस्ट बसचा ताफा वाढवणे आणि मुंबईकरांना दर्जेदार आणि खात्रीशीर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे प्राधान्यक्रम समजून न घेता सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आणि गैरवापर केल्याचे दिसत असून, यासाठी काढलेली निविदा सूचना तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बस थांब्यांची दुरवस्था
तथाकथित सौंदर्याचा आराखडा म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. वर्षभर पदपथ सतत खोदल्यामुळे उपनगरात स्टीलमध्ये बनवलेले असे अनेक सौंदर्यपूर्ण बस थांबे मोडकळीस आले आहेत. अनेक ठिकाणी या थांब्यांवरील धातूचे फलक चोरीला जात आहेत, परंतु बेस्ट/पालिका प्रशासनाने या बस थांब्यांची देखभाल करण्याची तसदी घेतलेली नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी स्वतः प्रवासी करत आहेत.
‘ग्रीन बस स्टॉप’च्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. याऐवजी बेस्ट प्रशासनाने नवीन बस खरेदी कराव्यात. याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केली असून, ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
- गॉडफ्राय पिमेंटा, प्रमुख, वॉचडॉग फाऊंडेशन
गेल्या वेळी एका बस थांब्यावर साडेतीन लाख रुपये खर्च झाला होता. या वेळी पैशांची उधळपट्टी होत आहे. पालिकेला बस थांबे उभारण्यासाठी एवढा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. सीएसआर फंडातूनही हे काम करता आले असते. कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पैसा उधळणे योग्य नाही.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06159 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..