
राणा दाम्पत्यांचा जामीन रद्द करा
मुंबई, ता. ९ : हनुमान चालिसा पठणाच्या आव्हानामुळे तुरुंगात जावे लागलेल्या राणा दाम्पत्याचा जामीन रद्दबातल ठरवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी आज विशेष न्यायालयात केली. याची दखल न्यायालयाने घेतली असून जामीन का रद्द करू नये, अशी नोटीस बजावली आहे. तसेच १८ मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
विशेष न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे आज पोलिसांच्या वतीने अर्ज करण्यात आला. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने कठोर अटी घातल्या आहेत. यामध्ये हनुमान चालिसा प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधू नये असे आदेश होते; मात्र लीलावती रुग्णालयातून बाहेर पडल्यावर नवनीत राणा यांनी याबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने करून पुन्हा राज्य सरकार आणि न्यायालयीन निर्देशांना आव्हान दिले, त्यामुळे त्यांचा जामीन रद्दबातल करून त्यांची रवानगी कारागृहात करावी, अशी मागणी पोलिसांनी अर्जात केली. हनुमान चालिसा पठण करणे हा गुन्हा असेल तर आम्ही १४ वर्षे कारागृहात जाण्यासाठी तयार आहोत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही विधानसभा निवडणुकीत उभे राहावे आणि स्वतःची लोकप्रियता तपासावी, अशी विधाने राणा यांनी माध्यमांसमोर केली आहेत. विशेष न्यायालयाने १८ मे रोजी या अर्जावर सुनावणी निश्चित केली असून राणा दाम्पत्याला हजर राहण्याचे आदेश आहेत. तसेच दोघांचाही जामीन अर्ज रद्द का करू नये, असा सवाल न्यायालयाने विचारला.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने राणा दाम्पत्याला ४ मे रोजी कठोर अटींसह जामीन मंजूर केला होता, राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान देऊन अमरावतीहून मुंबईत आले होते; मात्र ऐनवेळी त्यांनी आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला होता, परंतु प्रथमदर्शनी हा आरोप लागू शकत नाही, कारण त्यांनी आंदोलन मागे घेतले होते, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06164 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..