ॲड. सदावर्तेंकडून एसटी संघटनेची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. सदावर्तेंकडून एसटी संघटनेची घोषणा
ॲड. सदावर्तेंकडून एसटी संघटनेची घोषणा

ॲड. सदावर्तेंकडून एसटी संघटनेची घोषणा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता ॲड. सदावर्तेंनी सोमवारी जय श्रीराम या घोषणेसह नव्या एसटी कष्टकरी जनसंघाची घोषणा केली. ही संघटना राजकारणात सरकारविरोधात सक्रिय राहील, असे संकेतही त्यांनी दिले. आमची संघटना प्रस्थापित संघटनांना घाम फोडेल, कष्टकरी योग्य उमेदवार निवडून बँक निवडणुकीत विजय मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला गोडसेजी असे संबोधित करून सदावर्ते यांनी नवा वाद ओढवून घेतला.

गेल्या ७० वर्षांत कष्टकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी कोणतेही ठोस काम झालेले नाही, परंतु यापुढे आम्ही कष्टकऱ्यांसाठी लढू. त्यांना न्याय मिळवून देऊ. मातृभूमीसोबत प्रामाणिकपणा आणि मानवतावाद यातून कष्टकऱ्यांचा विकास ही आमची भूमिका आहे. रामजन्मभूमीचे आम्ही वकील होतो. न्यायालयात आम्ही याबाबत लढलो आहे. प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन यापुढे लढणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. यापुढे एसटी कामगार राज्यातील प्रत्येक निवडणुकीत उतरेल. आगामी मुंबई पालिका किंवा राज्यातील इतर निवडणुकीत कामगार सक्रिय राहून, वॉर्डा-वॉर्डात जाऊन राज्य सरकारची पोलखोल करतील, असा इशारा सदावर्ते यांनी दिला.

सदावर्ते यांनी कामगारांना भावनिक करून शेवटी संघटना स्थापन केलीच. साडेपाच महिने संप ताणून कामगारांचे लाखो रुपयाचे नुकसान केले. कायद्याने विलीनीकरण मिळवून देण्याचा दावा करून फसवणूक केली. न्यायालयात निकाल विरोधात जाऊनसुद्धा गुलाल उधळून न्यायालयाने सातवा वेतन आयोग दिलाय, पाच महिन्यांचा पगार दिलाय अशी धूळफेक केली. आता कामगारांची बॅंक उद्‍ध्वस्त करण्याचा यांचा कुटिल डाव कामगारच उद्‍ध्वस्त करतील.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य
ॲड. सदावर्ते यांनी या वेळी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा उल्लेख गोडसेजी असा केला. गांधीजींनी श्वास सोडताना हे राम म्हटले नव्हते, तर श्रीराम म्हटले असल्याचा दावा सदावर्ते यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असून देशात एक मोठे षड्‍यंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांकडून होत असल्याचा सनसनाटी आरोप सदावर्ते यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06165 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top