
दोनशेहून अधिक महिलांना लुटणाऱ्या दाम्पत्याला अटक दोनशेहून अधिक महिलांना लुटणाऱ्या ‘बंटी-बबली’ला अटक
मुंबई, ता. १० : पैसे गुंतवण्याच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी गुजरातमधील सुरत येथून अटक केली. दोनशेपेक्षा जास्त महिलांची फसवणूक करून त्यांनी आतापर्यंत पाच कोटींहून अधिक रक्कम लाटल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोस्टातील मुदत ठेव, म्युच्युअल फंड आणि खासगी कंपनीतील गुंतवणुकीतून पैसे दुप्पट देण्याच्या नावाखाली २०१४ मध्ये दोघांनी दोनशेहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरण उघड होताच दोघेही मालाडची मालमत्ता आणि घर विकून मुंबईबाहेर पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना शोधून काढून गजाआड केले.
मालाडमध्ये राहणारे मनीष आणि वंदना चौहान यांनी तब्बल पाच वर्षे बनावट पावती देऊन स्थानिकांची आर्थिक फसवणूक केली. दोघांनीही पोस्ट ऑफिसमध्ये १० वर्षांपासून काम करत असल्याचे भासवून, सर्वसामान्यांना मुदत ठेवीला चांगला परतावा मिळत असल्याचे सांगून गंडा घातला. बऱ्याच वेळा नागरिकांना चांगला परतावा मिळाल्याने मालाडमध्येच राहणाऱ्या एका महिलेने मुदत ठेवीसाठी त्यांना २५ हजार दिले होते. मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवल्याने तिने अजून ४१ हजार रुपये दिले. तिच्या काही नातेवाईकांनीही तब्बल सहा लाख रुपये ‘बंटी-बबली’ला दिले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशी केली असता चौहान दाम्पत्य काही दिवसांपूर्वी घर विकून फरार झाल्याचे समजले.
सूरतहून अटक
‘बंटी-बबली’ला दोनशेहून अधिक महिलांच्या फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात अनेकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. दोघांनी पाच कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे आणि योगेश कान्हेकर यांच्या पथकाने दोघांना सुरत येथून अटक केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06173 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..