
महाराष्ट्र सलग १९ दिवसांपासून भारनियमनमुक्त!
मुंबई, ता. १० : कोळसाटंचाईचे संकट व उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची वाढती मागणी कायम असताना महावितरणने गेल्या १९ दिवसांपासून राज्यात कोठेही विजेचे भारनियमन केलेले नाही. देशात मात्र उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आदींसह आठ राज्यांमध्ये अद्याप विजेचे भारनियमन सुरूच आहे.
मंगळवारी (ता. १०) दुपारच्या सुमारास राज्यात एकूण २६ हजार ७०० मेगावॉट विजेची मागणी होती. त्यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यामधील महावितरणच्या कार्यक्षेत्रात २३ हजार ४०० मेगावॉट विजेची मागणी होती. त्यानुसार महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला आहे. २१ एप्रिलपासून राज्यात कोठेही भारनियमन करण्यात आलेले नाही. सोबतच कृषिपंपांनाही वेळापत्रकानुसार चक्राकार पद्धतीने दिवसा व रात्री आठ तास वीजपुरवठा सुरळीत होत आहे.
गेल्या मार्चपासून उन्हाच्या वाढत्या तडाख्यांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच वेळी कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे विजेचे देशव्यापी संकट निर्माण झाले आहे. राज्यात एप्रिलमध्ये विजेची मागणी २४ हजार ५०० मेगावॉटवर गेल्यामुळे व त्या तुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने ८ ते १० दिवसांमध्ये विजेच्या भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, महावितरणच्या नियोजनामुळे २१ एप्रिलपासून राज्यात विजेचे भारनियमन झालेले नाही. विजेच्या मागणीचा विक्रमी उच्चांक होत असतानाही भारनियमन करण्यात आलेले नाही.
महावितरणच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास २३ हजार ४०० मेगावॉट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३०० मेगावॉट, गॅस प्रकल्प- २५०, अदाणी- २३८८, रतन इंडिया- १२००, सीजीपीएल- ५६३, केंद्र- ५६३०, सौर, पवन व इतर स्रोतांच्या नवीन व नवीकरणीय प्रकल्पांकडून ५०४५ मेगावॉट वीज उपलब्ध झाली. उर्वरित विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्प आणि आवश्यकतेनुसार खुल्या बाजारात वीज खरेदी करून राज्यात मागणीनुसार सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला.
उपलब्ध विजेवर बारकाईने लक्ष
महावितरणकडून सूक्ष्म नियोजन करून विजेची मागणी आणि त्या तुलनेत विविध स्रोत व वीजनिर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे, यावर तासागणिक बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मागणीनुसार पुरेशी वीज उपलब्ध करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याची फलश्रुती म्हणून एकीकडे देशातील १५ राज्यांमध्ये विजेचे भारनियमन सुरू असताना महाराष्ट्रात मात्र सलग १९ दिवसांपासून सुरळीत वीजपुरवठा सुरू आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06181 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..