
दक्षिण मुंबईत घरखरेदीला पसंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मायानगरी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगतो. त्यासाठी परवडणाऱ्या किमतीत सर्व सुविधांनी युक्त असलेल्या भागात घर खरेदीला ग्राहका प्राधान्य देतात. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआर) मेट्रो, समुद्री मार्ग, उड्डाणपूल यासह विविध पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याने घर खरेदीदार या क्षेत्रात घर खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही दक्षिण मुंबईला घर खरेदीत अधिक पसंती मिळत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली टाळेबंदी आणि त्यानंतर सातत्याने वाढत असलेल्या कच्च्या मालाच्या किमती, यामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र मार्च २०१८ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये मुंबई महानगर प्रदेशात घर खरेदीत तब्बल ४८ टक्के वाढ झाली आहे; तर एकूण विक्रीतील तब्बल ६८.८ टक्के विक्री ही एकट्या दक्षिण मुंबईत झाली आहे.
एमसीएचआयचा सीआरई मॅट्रिक्स अहवाल मंगळवारी (ता. १०) सादर करण्यात आला. वाढत्या किमतींमुळे या उद्योगक्षेत्राने मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये काहीशी घसरण अनुभवली असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या सवलती आणि प्रोत्साहनपर धोरणांचा लाभ झाल्याचे दिसत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
किमतीत वाढ
मध्य उपनगर : नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२२ - विक्री झालेल्या सदनिकांच्या किमतीत सातत्याने ११४ टक्के वाढ
पश्चिम उपनगर : मार्च २०२१ ते मार्च २०२२ या काळात विक्री झालेल्या सदनिकांच्या सरासरी किमतीत ७ टक्क्यांची वाढ
एमएमआर क्षेत्र : मार्च २०१८ ते मार्च २०२२ या काळात विक्री झालेल्या सदनिकांच्या सरासरी किमतीत १२.५ टक्के वाढ
नोव्हेंबर ते मार्च कालावधीतील घर विक्री
महिने एमएमआर दक्षिण मुंबई मध्य मुंबई
नोव्हेंबर २०२१ १५,८८१ २५२ ५०३
डिसेंबर २०२१ १२,६३१ २६६ ३७०
जानेवारी २०२२ १५,८४२ २४६ ३४१
फेब्रुवारी २०२२ १९,६२ ३३५ ४२६
मार्च २०२२ २९,४४५ ५५७ ९९४
मार्च महिन्यातील वर्षनिहाय घर खरेदी
वर्ष एमएमआर दक्षिण मुंबई मध्य मुंबई
२०१८ - २२,१३० ३३० ४४९
२०१९- २०,२०५ २६३ ३४५
२०२० - १२,११२ १४३ १९५
२०२१ - ४१,५०७ ८५८ १३०४
२०२२ - २९,४४५ ५७५ ९९४
उद्योगक्षेत्रांच्या वाढीमध्ये अडथळा
१) गेल्या काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट उद्योग क्षेत्र चांगलेच सावरले आहे. या क्षेत्राचे गाडे पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारकडून मिळालेल्या मदतीला एमएमआर क्षेत्राने चांगले पाठबळ दिले व या मदतीची उपयुक्तता ठोसपणे सिद्ध केली आहे; मात्र एक शिखर संस्था या नात्याने स्टील आणि सिमेंटच्या वाढत्या किमतींमुळे बदलती परिस्थिती व त्याचा सध्याच्या वाढीच्या वेगावर मोठा परिणाम होत आहे.
२) घर विकत घेणाऱ्यांसाठी आणि त्यामुळे रिअल-इस्टेटशी संबंधित विविध उद्योग क्षेत्रांच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. या उद्योग क्षेत्राने खंबीरपणे उभे रहावे यासाठी स्टँप ड्युटीमध्ये हळूहळू कपात करण्यात यावी, यासंदर्भात सरकारने विचार करावा. यासाठी संबंधित मंत्रालये आणि अधिकारी विभागांशी आम्ही संवाद साधत राहू, असे क्रेडाई-एमसीएचआयचे मानद सचिव धवल अजमेरा यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06184 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..