
लोकांना आरक्षणाच्या हक्काची जाणीव करून द्या!
मुंबई, ता. १० ः सत्तेचे राजकारण करताना त्यापूर्वी समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच खासगी क्षेत्रही टिकणे महत्त्वाचे आहे. खरेतर आरक्षण हे सर्वसामान्यांच्या विकासाचे शस्त्र आहे, ते नसल्यास काय परिणाम होतील, याची जाणीव लोकांना करून द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केले.
‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकात गेल्या काही वर्षांत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लिहिलेल्या संपादकीय लेखांवर आधारित ‘समकालीन राजकारण, आंबेडकरवादी आकलन’ या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. त्या प्रसंगी ते बोलत हेाते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, रेखाताई ठाकूर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, दिग्दर्शक नीरज गायवान आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले की, सध्याच्या जगात स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही प्रत्येकाची गरज झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत एका आरक्षणाच्या माध्यमातूनच दुसरे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरक्षण गेल्यानंतर समाजाची काय परिस्थिती होईल, याची जाणीव लोकांला होणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात देशात धार्मिक शक्ती वाढत आहेत. त्याचे कारण म्हणजे आपण त्याला विरोधच करत नाही. बाबासाहेबांचे विचार जनमानसात पोहोचवायचे असतील, तर आंबेडकरवादाचा प्रचार व्हायला हवा.
---
ॲड. आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका
ज्येष्ठ विचारवंत प्रा. दिलीप मंडल यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत उभा केला जात नसल्याची टीका सत्ताधाऱ्यांवर केली, मात्र केंद्रात १९९० मध्ये तेरा महिन्याचे सरकार असताना काही प्रमाणात का होईना, आंबेडकरांच्या मनातील भारत उभा करण्यासाठी मंडल आयोगाचा प्रयत्न झाला. या प्रयत्नांमुळे विकासापासून दूर असलेल्या ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या मिळाल्या. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची होती, अशी आठवण मंडल यांनी करून दिली.
---
काँग्रेस चुका मान्य करत नाही!
काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय स्थितीला काँग्रेसच जबाबदार आहे. देशासह बहुसंख्य राज्यांमध्ये सत्तेत असलेला पक्ष सध्या सत्तेपासून दूर आहे. पण आपण कशामुळे सत्तेपासून दूर आहोत, आपल्या कोणत्या चुका झाल्या याचा शोध काँग्रेस घेत नाही. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. व्ही.पी.सिंग सत्तेत आल्यानंतर तो देण्यात आला, पण काँग्रेस अजून या चुका मानायला तयार नाही, अशी खंत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06190 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..