
ट्रान्झिट जामीन देणे योग्य का?
मुंबई, ता. ११ : न्यायालयीन क्षेत्राबाहेर गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला ट्रान्झिट जामीन मंजूर करणे योग्य आहे का, हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपीठाकडे सोपवला. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाने याबाबतचे आदेश नुकतेच दिले. नागरिकांचे स्वातंत्र्य, कायदेशीर तरतुदी, तपास यंत्रणेला येणाऱ्या अडचणी आदींबाबत स्पष्टता येण्याची गरज आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
एखाद्या प्रकरणात केवळ आरोपीला त्रास देण्यासाठी तक्रारदार खोटी तक्रार दाखल करू शकतो. यामध्ये तक्रारदार आणि तपास यंत्रणाही सामील असू शकतात. त्यामुळे याबाबत ठोस निर्णय व्हायला हवा, असे खंडपीठाने म्हटले आहे. अनेकदा आरोपीही बोगस माहिती देऊन संरक्षण मिळवत असतात, अशा वेळी यावर पूर्णपीठामार्फत निर्णय होणे आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे अन्य राज्य किंवा शहरात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना ट्रान्झिट जामीन मंजूर करण्याचा मुद्दा पूर्णपीठाकडे सोपवला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह आणि महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनीही यामध्ये बाजू मांडली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06193 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..