
सीएसएमटीच्या सौंदर्य प्रसाधनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वे मुंबई विभागाने सीएसएमटी येथे गैरशुल्क महसूल अंतर्गत प्रथमच वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन केंद्रे सुरू केली आहेत. उत्पन्न वाढीसाठी मध्य रेल्वेतर्फे मार्चमध्ये ही केंद्र सुरू केली गेली. येथील आकर्षकता, संपूर्ण सलूनची ठेवण यामुळे येथे ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. या मागील दीड महिन्यात तीन हजार ग्राहकांनी या सलून सेवेचा लाभ घेतला.
लोकल आणि स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीला सलूनची अडचण होणार नाही, अशारीतीने मध्य रेल्वे सलूनची सीएसएमटीवर उभारणी केली आहे. महसूलवाढीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत मध्य रेल्वेने सीएसएमटीत एसी सलून आणि स्पा उभारले. हे सौंदर्य प्रसाधन केंद्र २४ मार्चपासून सुरू झाले आहे. या उपक्रमामुळे मध्य रेल्वेला ५ वर्षांसाठी ७५ लाख रुपयांचा महसूल मिळेल. बांधकाम, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन यासाठीचे १४ लाख ७७ हजार रुपये प्रतिवर्ष या प्रमाणे पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट देण्यात आले आहे.
सौंदर्य प्रसाधन केंद्रावर जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने इत्यादी वस्तूंच्या विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. बॉडी मसाज चेअरद्वारे मसाजची सुविधा, फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, सलूनमध्ये केशभूषा, शेव्हिंग, फेशियल पेडीक्योर, मॅनिक्युअर, हेअर कटिंगची सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येत आहे. सीएसएमटी येथील पर्सनल केअर सेंटर २४ तास खुले असणार आहे. जेणेकरून उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याचे प्रवासी या सुविधेचा कोणत्याही वेळी लाभ घेऊ शकतील.
सेवांच्या दरात घट
सर्वसामान्य नागरिकांना या सौंदर्य प्रसाधन केंद्राचा लाभ घेता यावा याकरिता शेव्हिंग आणि कटिंगच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट केलेली आहे. त्यामुळे पुरुषांचा शेव्हिंग दर १५० रुपयांवरून १०० रुपये केले आहेत. हेअर कटिंगचे दर १८० वरून १५० रुपये केले आहे. तसेच, महिला हेअर कटिंगचे दर ६७० रुपयांवरून ३५० रुपये केले आहेत. दररोज येथे विविध सेवा घेण्यासाठी ५० ते ६० ग्राहक येतात. तसेच येथे सरकारी, खासगी विभागांत काम करणाऱ्या महिलांचीही संख्या अधिक आहे, असे सौंदर्य प्रसाधन केंद्राचे व्यवस्थापिका वैलेंसिया परेरा यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06199 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..