
दरडप्रवण क्षेत्राला सुरक्षाकवच
मुंबई : उपनगरांमधील दरडप्रवण क्षेत्राला म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने सुरक्षा कवच निर्माण केले आहे. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या तब्बल ४० ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे. यापैकी ३० कामे पूर्ण झाली असून ११९ कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार मंडळाने केला आहे; तर काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास जागा उपलब्ध नसल्याने संरक्षण भिंतींच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.
शहर आणि उपनगरांमधील विविध डोंगराळ भागात हजारो नागरिकांनी झोपड्या उभारल्या आहेत. पावसाळ्यात डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. शहर आणि उपनगरात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. या घटनांमध्ये दरवर्षी कित्येक लोकांना जीव गमवावा लागतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत दरड प्रमाण क्षेत्रात संरक्षण भिंत उभारण्यात येते. यासाठी २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन निधीतून मंडळाला ७२ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत उभारण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे.
भौगोलिक विभागाने मंडळाला पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ४० ठिकाणांची यादी सादर केली आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचे काम मंडळाने सुरू केले आहे. त्यानुसार २४७ कामे मंजूर केली आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आली असून ३० कामे पूर्ण झाली असून ११९ कामे प्रगतिपथावर आणि ९८ कामे सुरू करण्यात येणार आहेत. मंडळाने गत वर्षी दरड कोसळलेल्या विक्रोळी, भांडुप येथील दरडप्रवण क्षेत्रात संरक्षण भिंत उभारली आहे. तर इतर ठिकाणची कामे वेगाने सुरू आहेत. तर चांदिवली, भारत नगर, मुलुंड येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने येथे संरक्षण भिंत उभारण्यात अडचण येत असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरडप्रवण क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मंडळाने कामे हाती घेतली आहेत. बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. अंतिम टप्प्यात असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येतील.
- विकास रसाळ, मुख्य अधिकारी, झोपडपट्टी सुधार मंडळ.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06202 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..