
तळईत घरे उभारणीचे काम रखडले
मुंबई, ता. ११ : महाड येथील तळिये गावातील कुटुंबीयांसाठी घरे उभारण्यासाठी म्हाडाने सर्व तयारी केली आहे; मात्र अजूनही पहिल्या टप्प्यातील ६३ घरांचे काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बाधितांना घरांचा ताबा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. सदर कामाला सुरुवात होण्यास आणखी एक आठवडा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळिये गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. तळिये आणि परिसरातील २६१ घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर (म्हाडा) सोपवली होती. दरडग्रस्त गाव आणि वाड्यांचे पुनर्वसन प्रकल्प दोन टप्प्यांत करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्र्यांनी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळिये गावातील ६३ कुटुंबांसाठी घरांची उभारणी दिवाळीपर्यंत करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्र्यांनी केली होती; मात्र भूसंपादन आणि निविदा मागवण्यात न आल्याने हे काम लांबणीवर पडले होते. अखेर म्हाडाने येथील घरे उभारण्यासाठी निविदा मागवून एका कंपनीची निवड केली आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस येथील काम सुरू करण्यात येणार होते; मात्र अद्यापपर्यंत येथे काम सुरू करण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06205 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..