
मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी लोकल
मुंबई, ता. ११ : तिकीट दर ५० टक्क्यांनी कमी झाल्याने एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मुख्य मार्गिकेवरून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवार (ता. १४) पासून मध्य रेल्वेवरील १२ सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून त्याऐवजी एसी गाड्या चालवण्यात येणार आहेत. १४ मेपासून हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्या रद्द होणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी रेकची संख्या कमी आहे. आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १२ एसी लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. काही एसी लोकल आता रविवारी आणि सुटीच्या दिवशीही चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण / टिटवाळा / बदलापूर मुख्य मार्गावर आठवड्यातील रविवार वगळता इतर दिवशी एकूण १२ एसी सेवांची वाढ झाली आहे. त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्या ४४ वरून ५६ पर्यंत वाढणार आहे. मात्र, लोकल सेवांच्या एकूण एक हजार ८१० लोकल फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. मध्य रेल्वेने रविवारी आणि सुटीच्या दिवशी १४ एसी लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होणार असल्याने त्यांचे मासिक वा त्रैमासिक पास धारक प्रवासी उपनगरी स्थानकांवर यूटीएस आरक्षण काऊंटरमधून शिल्लक दिवसांच्या भाडे फरकाचा परतावा मिळवू शकतात. ते सामान्य सेवांतील प्रथम श्रेणीतून प्रवास करू शकतात.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06214 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..