वडिलांना यकृतदान करण्यास न्यायालयाची मुलीला मनाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court forbids daughter to donate liver to father
वडिलांना यकृतदान करण्यास न्यायालयाची मुलीला मनाई

वडिलांना यकृतदान करण्यास न्यायालयाची मुलीला मनाई

मुंबई : आजारी वडिलांना स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्यासाठी परवानगी देण्याची १६ वर्षीय मुलीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. हा निर्णय मुलीने भावनिक दबावाखाली घेतला असावा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या तरतुदीनुसार अवयवदान करताना संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या संमतीची आवश्यकता असते. ही संमती न मिळाल्यास अवयवदान करणे शक्य नाही.

संबंधित प्रकरणात मुलीच्या जवळच्या सर्व नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली; मात्र केवळ मुलीचे यकृत चालू शकते, असा अहवाल देण्यात आला. त्यामुळे तिच्या आईने प्राधिकरणाकडे अर्ज केला होता; मात्र प्राधिकरणाने निर्णय न दिल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. केवळ भावनिक दबावाखाली मुलीने हा निर्णय घेतला आहे, असे निदर्शनास येते. मुलीचे वय लहान आहे आणि त्यांना अवयवदान प्रक्रियेतील तरतुदींची माहिती नाही, असा अहवाल प्राधिकरणाने दिला आहे. न्या. ए. के. मेनन आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने या अहवालाची दखल घेतली असून मुलीला अवयवदान करण्यासाठी मनाई केली आहे. शुक्रवारी (ता. १३) यावर सुटीकालीन न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अहवालात काय म्हटलंय?
वडिलांना मद्यपान करण्याच्या व्यसनातून हा आजार झाला आहे; मात्र यकृतदान केल्यानंतर ते बरे होतील, असे वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे ती स्वेच्छेने तयार झाली असे सांगता येत नाही, असे अहवालात नमूद केले आहे. अल्पवयीन मुलांना अवयवदान करण्याची परवानगी नाही; मात्र याबाबत कोणताही नियम नाही. संबंधित मुलगी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असून लग्नाच्या सहा वर्षांनंतर तिचा जन्म झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06216 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top