
गिरणी कामगारांच्या घरांची लवकरच सोडत
मुंबई, ता. १२ : एमएमआरडीएच्या घरांची सोडत काढण्याची मागणी गिरणी कामगार संघटनांकडून वारंवार करण्यात येत असल्याने म्हाडाने अखेर सोडत काढण्याची तयारी केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्राप्त होणाऱ्या दोन हजार ५२१ घरांची सोडत म्हाडा मुख्य कार्यालयात काढण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
एमएमआरडीएने पनवेल कोन येथील भाडेतत्त्वावरील योजनेसाठी उभारलेली घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर म्हाडामार्फत २०१६ मध्ये दोन हजार ४१७ घरांची सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर म्हाडाने काही पात्र कामगारांकडून घराची संपूर्ण रक्कम घेतली आहे; मात्र घरांचा ताबा अद्याप रहिवाशांना मिळालेला नाही. यातच या सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या विजेत्यांना मुंबईत घर देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती; मात्र गिरणी कामगार संघटनांनी गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेऊन घराची रक्कम भरलेल्या कामगारांना घरे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा कामगारांना पनवेल येथील घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच म्हाडाने एमएमआरडीएकडून प्राप्त होणाऱ्या घरांची सोडत काढण्याची तयारी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली आहे. मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळताच सोडतीची तारीख जाहीर करण्यात येईल, असे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
...........
विकसकांकडून मिळालेल्या घरांची सोडत
- मे. टाटा हाऊसिंग कंपनी लि. जि. ठाणे - १२४४ सदनिका
- विनय अगरवाल शिलोटर, रायचूर, जि. रायगड - १०१९ सदनिका
- मे. सानवो व्हिलेज, कोल्हे, ता. पनवेल, जि. रायगड - २५८ सदनिका
एकूण २ हजार ५२१
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06220 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..