सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार!
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार!

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने अतिशय चांगले काम केले. मात्र, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्या दिशेने राज्य सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.

राज्य सरकारने राज्यस्तरीय जनजागृती परिषदेतून आरोग्य समस्यांच्या उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गुरुवारी (ता. १२) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित परिषद भरवण्यात आली होती. राज्यभरातील राज्य अधिकारी परिषदेमध्ये सहभागी झाले होते. त्या वेळी अजित पवार बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी साांगितले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही आरोग्य विभागाच्या व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असेही ते म्हणाले.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. अलीकडेच पाच ते सहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन केले जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. कोरोना कालावधीत आपण स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. त्या कायम ठेवायला हव्यात. आरोग्याच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कालसुसंगत बदल करण्यासाठी सूचना द्याव्यात. या योजनेत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश करता येईल का, याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी धर्मादाय दवाखान्यातून सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी काय करता येईल यावर विचार केला जाईल, असे सांगितले. दिव्यांग नागरिकांना तालुका स्तरावर दाखले देण्यासाठी व्यवस्था केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली. तत्पूर्वी जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने विविध विषयांवर झालेल्या चर्चेत तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

किमान ३० टक्के खाटा मिळतील
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. ही योजना पूर्णपणे रुग्णकेंद्रित करण्यासाठीचा प्रयत्न आहे. या योजनेत समावेश नसलेल्या उपचारांचा समावेश कशा पद्धतीने करता येईल यावर विचार केला जाईल. धर्मादाय कायद्यातील कलमात आवश्यक बदल करून या योजनेसाठी किमान ३० टक्के खाटा उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06230 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top