
प्रवीण दरेकर यांना अटक आणि जामीन
मुंबई, ता. १३ : विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात आज (ता. १३) अटक करण्यात आली; मात्र अटकेनंतर दरेकर यांना तत्काळ जामीनदेखील मिळाला. उच्च न्यायालयाने दरेकर यांना दिलासा देत या गुन्ह्यात अटक झाल्यास तत्काळ सुटका करण्याचे आदेश देत नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
मुंबई बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्यामुळे प्रवीण दरेकर अडचणीत आले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दरेकर यांना अपात्र ठरवत मजूर म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ३५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामिनदारांची हमी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानुसार दरेकर यांना पोलिस अटक दाखवून जामीन देण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06246 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..