
अल्पवयीन मुलांना अवयवदानाची परवानगी नाही
मुंबई, ता. १३ : यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या वडिलांना स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्यासाठी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. अल्पवयीन मुलांना अवयव दान करण्याची परवानगी नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या अवयव प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी प्रमाणे स्थापन केलेल्या प्राधिकृत समितीने यापूर्वी मुलीचा अर्ज नाकारला आहे. त्यामुळे आई आणि मुलीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यावर न्या. ए के मेनन आणि न्या. एन आर बोरकर यांच्या खंडपीठाने सुनावणी झाली. खंडपीठाने यकृत दान करण्याची मुलीची मागणी फेटाळून लावली. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार अल्पवयीन मुलगी अवयव दान करू शकत नाही, त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित समितीची परवानगी आवश्यक आहे. आजारी वडिलांच्या यकृतावर दारू मुळे परिणाम झाला आहे. मात्र अवयव दान करुन ते ठीक होतील याची माहिती नाही, तसेच मुलीला व तिच्या आईला या शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीबाबत योग्य ती माहिती नाही, मुलगी एकुलती एक असून अवयव दान करण्यासाठी तिच्यावर भावनिक दबाव टाकण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही असा अहवाल समितीने दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तहकूब केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06248 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..