
दरेकर यांच्याविरोधात ९०० पानांचे आरोपपत्र
मुंबई, ता. १३ : मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणात आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी बॅलार्ड पीअर येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुमारे ९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकर यांनी बँकेच्या निवडणुकीत बोगस कागदपत्रे देऊन उमेदवारी दाखल केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच आरोपपत्रात भाजपचे प्रवीण मारगज आणि श्रीकांत कदम यांचाही उल्लेख आहे.
एमआरए मार्ग पोलिसांनी आज ९०४ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये २९ साक्षीदारांची यादी असून पोलिस आणि काही शासकीय अधिकारी आहेत. तसेच बँकेचे काही कर्मचारीदेखील आहेत. आम आदमी पार्टीचे नेते धनंजय कापसे यांनी दरेकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. सन १९९७ मधी प्रतिज्ञा सहकारी सोसायटीच्या सदस्य म्हणून त्यांनी मजूर नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांनी दहा वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आमदार म्हणून निवडून आल्यावर देखील त्यांनी ही नोंद कायम ठेवली होती, असा आरोप करण्यात आला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06252 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..