
तिकिट दलालांविरुद्ध मध्य रेल्वेची कारवाई
मुंबई : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त रेल्वेने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेचे तिकीट कन्फर्म होणे कठीण असल्याने अनेक जण दलालामार्फत तिकीट काढतात. मात्र, या प्रवाशांची दलालांकडून फसवणूक झाल्याचे प्रकार होत आहेत. दलालांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी दलालविरोधी पथकाद्वारे धडक कारवाई केली जात आहे. या कारवाईच्या अंतर्गत पाच प्रकरणांतून १ लाख ६२ हजार ३१३ किमतीची ८९ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. दलालविरोधी पथक (एटीएस) आणि आरपीएफच्या मदतीने वाणिज्य शाखेने ही मोहीम राबवली. मागील आर्थिक वर्षात दलालविरोधी पथकाने दलालांविरुद्ध २७ गुन्हे नोंदवले. ६४६ तिकिटे आणि ७ लाख ९९ हजार ७५९ रुपये किमतीची तिकिटे जप्त केली.
मुंबई विभागातील तिकीट तपासणीचे दलालविरोधी पथक, रेल्वे सुरक्षा दलाचे एसआयपीएफ, सीआयबी, कल्याणच्या आयटी सेलच्या सदस्यांनी १३ मे रोजी विलेपार्ले पूर्वेकडील एव्हियन हॉटेल येथे सापळा रचून घनश्याम प्रजापती नावाच्या व्यक्तीला अटक केली. त्याची चौकशी केली असता, या व्यक्तीने स्वेच्छेने ३७ हजार ९९५ रुपये किमतीचे रेल्वे आरक्षण तिकीट दिले. तो कमिशन तत्त्वावर काम करत आहे. प्रजापतीला कांदिवली पूर्वेकडील पोईसर येथील रहिवासी रमेश यादव नावाच्या व्यक्तीने कामावर ठेवले होते. घनश्याम प्रजापती आणि रमेश यादव या दोघांना रेल्वे सुरक्षा दल, घाटकोपर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्याण स्थानकावर ११ मे रोजी गाडी क्रमांक १२१३८ अप पंजाब मेलमध्ये एक व्यक्ती रेल्वे प्रवास तथा आरक्षण तिकीट घेण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली. या खबरीच्या आधारावर, त्या व्यक्तीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. तत्काळ एटीएसच्या पथकाने एसआयपीएफ, आरपीएफच्या मदतीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, संतोष गुप्ता नावाच्या व्यक्तीकडे १५ हजार ५४० रुपये किमतीची तीन रेल्वे आरक्षण तिकिटे आढळून आली. आवश्यक कारवाईसाठी गुप्ताला आरपीएफ, कल्याण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या निवासस्थानी तपास केला असता, एक मोबाईल, एक सीपीयू आणि ४३ ई-तिकिटांसह १ लाख ५ हजार ८९३ रुपये जप्त करण्यात आले. संतोष गुप्ताकडून जप्त केलेल्या तिकिटांची एकूण किंमत १ लाख २१ हजार ४३३ आहे. त्याचे सॉफ्टवेअर खरेदी आणि आर्थिक व्यवहार याबाबत पुढील तपास सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी तिकिटे अधिकृत एजंट किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्रातून खरेदी करावीत किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बुक करावीत, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06262 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..