
पश्चिम रेल्वे आणखी गारेगार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. एसी लोकलच्या तिकीटदरात ५० टक्के कपात केल्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. मात्र, लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना एसी लोकलचा वापर करणे कठीण होत होते. त्यामुळे आता मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेवरून १६ मेपासून एसी लोकलच्या १२ फेऱ्या वाढणार आहेत.
राज्यात उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. त्यात एसी लोकल तिकिटाचे दर कमी झाल्याने प्रवाशांनी थंडगार प्रवासासाठी एसी लोकलकडे धाव घेतली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहता, पश्चिम रेल्वेने १६ मेपासून पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्यात वाढ केली जाणार आहे. १२ नवीन एसी लोकलच्या फेऱ्या सुरू केल्यामुळे पश्चिम रेल्वेवर एसी सेवांची एकूण संख्या आता २० वरून ३२ वर जाईल.
एसी लोकल प्रवासाच्या तिकिटांचे भाडे ५ मेपासून ५० टक्के कमी करण्यात आले. या कपातीमुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. एसी लोकलने १० किमीपर्यंतच्या सिंगल प्रवासाचे तिकीट ३५ रुपये आहे. त्यामुळे, प्रवाशांच्या सोयीसाठी, १६ मेपासून आणखी १२ एसी लोकल सुरू करण्यात येणार आहेत. यामधील सहा फेऱ्या डाऊन आणि सहा अप दिशेने धावणार आहेत. विरार ते चर्चगेट दरम्यान पाच, भाईंदर ते चर्चगेट दरम्यान एक एसी लोकलची फेरी धावेल; तर चर्चगेट ते विरारदरम्यान चार सेवा, चर्चगेट ते भाईंदर आणि अंधेरी ते विरारदरम्यान प्रत्येकी एक एसी लोकलची फेरी धावेल.
तिकीटविक्री वाढली!
पूर्वी प्रतिदिन एक ते अडीच हजार तिकिटांची विक्री होती. मात्र, वाढती उष्णता आणि एसी लोकलमध्ये मिळालेली सवलत यामुळे दिवसागणिक एसी लोकलची प्रवासीसंख्या वाढत आहे. त्यामुळे आता पाच हजारांहून अधिक तिकिटांची विक्री होत आहे. हा प्रतिसाद पाहता लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करणे अनिवार्य असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06264 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..