
पाच जिल्ह्यांत १०० टक्के बूस्टर डोस
मुंबई, ता. १५ : राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि जळगाव अशा पाच जिल्ह्यांत १०० टक्के बूस्टर डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर येत आहे. पाचही जिल्ह्यांत बूस्टर डोसची मोहीम पूर्ण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून ६० वर्षांवरील २१,३६,६३८ लाभार्थी बूस्टर डोससाठी पात्र ठरले होते. त्यातील १५,२६,९३३ म्हणजे ७१.४६ टक्के लाभार्थींनी १२ मेपर्यंत बूस्टर डोस घेतला. शनिवारी हीच आकडेवारी १०० टक्क्यांवर गेली. दरम्यान, राज्यात सुमारे १० टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु बूस्टर डोस पात्र लाभार्थी अपेक्षित लोकसंख्येपेक्षा वेगळे आहेत. १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारे ३९ दिवसांचा निकष पूर्ण करत असल्याने त्यांचे बूस्टर डोस पूर्ण झाल्याचे राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.
वाशिममध्ये शनिवारपर्यंत ३५,७३८ ज्येष्ठ नागरिक पात्र होते; परंतु केवळ ६,५३९ म्हणजेच १८.२९ टक्के जणांनीच डोस घेतला. गडचिरोलीमध्ये ९,४२६ बूस्टर पात्र ज्येष्ठ नागरिकांपैकी केवळ २,०२५ म्हणजे २१.४८ टक्के जणांनी डोस घेतला. बुलढाण्यामध्ये ५८,३१४ ज्येष्ठ नागरिकांपैकी केवळ १४,०६३ म्हणजेच २४.१२ टक्के जणांनी डोस घेतला. नांदेड जिल्ह्यात २७.६४ टक्के, गोंदियात २९.२१ टक्के, परभणीत ३० टक्के, हिंगोलीत ३२.५५ टक्के आणि वर्धा ३९.५९ टक्के अशा इतर जिल्ह्यांतही बूस्टर पात्र ज्येष्ठ नागरिकांना पुढे येण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
वाशीम पिछाडीवर
बूस्टर डोसच्या ज्येष्ठ लाभार्थींमध्ये सुमारे २६ जिल्हे अद्यापही राज्याच्या सरासरीपेक्षा उणे आहेत. केवळ नऊ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा बूस्टर लसीकरण झाले असल्याचे सांगण्यात आले. गडचिरोली, वाशीम, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये बूस्टर लसीकरण कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये वाशिम अजूनही पिछाडीवर आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06271 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..