कमावत्या पत्नीलाही पोटगीचा अधिकार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

high court women get right of Alimony mumbai
कमावत्या पत्नीलाही पोटगीचा अधिकार!

कमावत्या पत्नीलाही पोटगीचा अधिकार!

मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये महिला स्वतः कमावत्या असल्या, तरी त्यामुळे त्यांचा पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे अनेक घटस्फोटित नोकरदार महिलांना दिलासा मिळाला आहे. सुमारे १३ वर्षांपूर्वी विवाह झालेल्या आणि एक मुलगा असलेल्या पती-पत्नीच्या घटस्फोटाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. पत्नीने पती आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे.

त्यांचा १० वर्षांचा मुलगा आईबरोबर असतो. त्यामुळे मुलगा आणि स्वतःसाठी पोटगी मिळण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. कोल्हापूर सत्र न्यायालयाने महिला आणि मुलाला पाच हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले आहेत. याविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली. पत्नी नोकरी करते आणि ती दर दिवशी सुमारे दीडशे रुपये कमावत आहे. त्यामुळे तिला स्वतंत्र पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद पतीच्या वतीने करण्यात आला. पत्नी स्वत:चा खर्च सहजपणे करत आहे, कमावत्या पत्नीला वेगळी पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा दावा त्याने केला होता. मात्र न्या. एन. जे. जमादार यांनी हा युक्तिवाद अमान्य केला.

न्यायालयाचे म्हणणे...
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत महिलांना काम करावे लागते, ही आजच्या परिस्थितीची गरज आहे. त्यामुळे जरी ती १५० रुपये दरदिवशी कमावत असली आणि तिला पाच हजार रुपयांची पोटगी संमत झाली, तरीदेखील ही रक्कम खर्चासाठी अपुरीच असणार आहे. जरी पत्नी कमावण्यासाठी सक्षम असली, तरी पतीने तिची देखभाल करणे ही कायदेशीर तरतूद आहे. कमावत्या पत्नीच्या पोटगीच्या अधिकारात तिच्या अर्थार्जनामुळे अडथळा येऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने मांडले आहे. तसेच पतीची याचिका अमान्य करून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06279 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top