चिमुकल्याच्या दृष्टीत डॉक्टरांनी आणला ‘जीव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्याच्या दृष्टीत डॉक्टरांनी आणला ‘जीव’
चिमुकल्याच्या दृष्टीत डॉक्टरांनी आणला ‘जीव’

चिमुकल्याच्या दृष्टीत डॉक्टरांनी आणला ‘जीव’

मुंबई : इजा होणाऱ्या वस्तूंशी लहान मुले खेळत असताना अनेक अपघात घडतात. त्यातून त्यांना कायमचे अपंगत्वही येते; पण यातून तीन वर्षांच्या बालकाची सुटका करण्यात पालिकेच्या डॉक्टरांना यश आले आहे. मुंबईत राहणाऱ्या तीन वर्षांच्या एका मुलाला मागच्या आठवड्यात अपघात झाला. यात त्याच्या डोळ्याला गंभीर जखम झाली. त्याची दृष्टी वाचत नाही, असे वाटत असतानाच पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात त्या लहानग्याच्या डोळ्यावर उपचार करून त्याची दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

रुषभ विश्वकर्मा (नाव बदलेले आहे) हा ३ वर्षांचा मुलगा घरी स्क्रू ड्रायव्हर व तत्सम वस्तूशी खेळत होता. या वेळी त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाल्यावर त्याला २८ एप्रिलला रात्री उशिरा पालकांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या मुलाच्या नेत्रतज्ज्ञांनी तपासणी केली असता, डोळ्यातील लिंबल फाटल्याच्या अवस्थेत आढळून आले. ही स्थिती इतकी गंभीर होती की, रक्त पसरण्यास सुरुवात झाली. शिवाय ही जखम दृष्टी पटलापर्यंत पसरत चालली होती. डोळ्याच्या स्थितीचे निदान केल्यानंतर त्यावर तातडीने शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी पालकांना समजावून सांगितले.

निदान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. राजावाडी रुग्णालयाच्या नेत्र विभागप्रमुख डॉ. जिगीषा शर्मा यांच्या निरीक्षणाखाली डॉ. रचना दाभाडे यांनी ही शस्त्रक्रिया केली. यात डोळ्याचा फाटलेला भाग शिवून एसी वॉश करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर डोळा योग्य स्थितीत आला; मात्र बुबुळातून पाणी येत असल्याचे सांगण्यात आले. डोळ्याने दिसू लागल्याने दृष्टी चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच शस्त्रक्रिया करताना लहानग्यांना भूल देणे आव्हानात्म्क असते. त्यामुळे भूलतज्ज्ञ विभागाच्या डॉ. रिना नेबू यांच्या निरीक्षणाखाली डॉ. हर्षदा पांगम यांनी मुलाला भूल दिली. या मुलावर शस्त्रक्रिया उपचार करून तो सध्या गावी निघून गेला आहे.

हा मुलगा तीन वर्षाचा होता. त्याला डोळ्याला गंभीर मार बसला होता. त्यामुळे दृष्टी जाण्याची शक्यता होती. लहान मुलांना भूल देणे अवघड असले, तरी तज्ज्ञांनी यशस्वीपणे उपचार करून त्या लहानग्याची दृष्टी वाचवली. आता उपनगरीय रुग्णालयांमध्येही मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.
- डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06289 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top