विद्यार्थ्यावर अमानुषपणे ओरडून नैराश्यग्रस्त करण्याचा प्रयत्न! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यावर अमानुषपणे ओरडून नैराश्यग्रस्त करण्याचा प्रयत्न!
विद्यार्थ्यावर अमानुषपणे ओरडून नैराश्यग्रस्त करण्याचा प्रयत्न!

विद्यार्थ्यावर अमानुषपणे ओरडून नैराश्यग्रस्त करण्याचा प्रयत्न!

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : विद्यार्थ्यावर अत्यंत अमानुषपणे ओरडून त्याला नैराश्यग्रस्त करण्याचा प्रयत्न शिक्षकाने केला, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर शाळेच्या अध्यक्षांना अटकपूर्व जामीन नाकारला. शिक्षक ओरडले म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली होती. मृत विद्यार्थ्याच्या आजोबांनी संबंधित अध्यक्षाविरोधात तक्रार केली आहे. अध्यक्ष ओरडल्यानंतर मुलाने जीवन संपवले, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी पोलिस ठाण्यात शिक्षक गणपतराव पाटील यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे, अमानुषपणे ओरडणे, जाणीवपूर्वक अवमान करणे, शांतता भंग करणे इत्यादी आरोप ३०५, ५०४ आणि ५०६ कलमांतर्गत त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्याच्या आजोबांनी एप्रिलमध्ये पाटील यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांचा नातू दहावीत शिकत होता. खेळत असताना त्याने फुटबॉल जोरात फेकल्याने तो एका विद्यार्थिनीला लागला आणि ती पडली. त्यावरून पाटील यांनी आजोबांना शाळेत बोलावून घेतले. नातवावर ते अपमानास्पद भाषेत ओरडले. आक्षेपार्ह शब्द त्यांनी वापरले. त्यानंतर आजोबा नातवाला घेऊन घरी गेले; पण काही वेळातच मुलाने आत्महत्या केली.

पाटील शाळेचे अध्यक्ष असून कोणत्याही वाईट हेतूने ते मुलावर ओरडले नाहीत. शिस्त राखण्यासाठीच ते बोलले, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. मात्र, वकिलांनी त्याचे खंडन केले. विद्यार्थ्यांना अमानवी आणि अपमानास्पद वागणूक देणे बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील एम. आर. तिडके यांनी केला.

मुलाच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही!
न्या. विनय जोशी यांनी दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवादानंतर अध्यक्षांना जामीन नामंजूर केला. शिक्षकांना विद्यार्थ्यांना बोलण्याचा अधिकार आहे; पण मुलांचे मानसिक खच्चीकरण होईल, ते नैराश्यग्रस्त होतील, असे वागणे योग्य नाही. पाटील ओरडल्यानंतर काही तासांत मुलाने जीवन संपवले याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिस कोठडीची आवश्यकता असून जामीन मंजूर होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06295 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top