
आरटीई प्रवेशाची पुन्हा अनागोंदी
मुंबई, ता. १८ : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशात पुन्हा एकदा अनागोंदी समोर आली आहे. प्रवेशासाठीच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याने पहिल्या फेरीतच तब्बल २७ हजार ८३७ मुले या प्रवेशापासून मुकली आहेत. इतकेच नव्हे तर पुढील प्रवेश फेरीसाठी यातील एकाही मुलांचा विचार न करता त्यांचे प्रवेश अर्जच बाद झाल्याने हजारो पालकांना धक्का बसला आहे.
आरटीईच्या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण करून गुरुवारपासून (ता. १९) दुसऱ्या फेरीला सुरुवात केली जाणार आहे. या फेरीमध्ये जी मुले प्रतीक्षा यादीमध्ये होती अशांना प्रवेश दिले जाणार आहेत. या प्रतीक्षा यादीत बालकांच्या पालकांना संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ मेपर्यंत मुदत आहे. पालकांनी लॉगिनमधून अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. हे लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन दिलेल्या मुदतीत पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून २७ मेपर्यंत तपासणी करावी व बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश निश्चितीची पावती घेऊन शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केले.
पहिल्या प्रवेश फेरीत राज्यातील तब्बल २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाला मुकले असून यावर शिक्षण विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप फुले-शाहू-आंबेडकरी विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी केला आहे. दरम्यान, झालेल्या अनागोंदी संदर्भात शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.
हजारो मुलांचे शिक्षण रोखले!
ज्या शाळा निकषाप्रमाणे दूरवरच्या अंतरात होत्या, त्यासाठीचा विचारही प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केला नसल्याने विभागाच्या चुकीमुळे हजारो मुलांचे शिक्षण रोखले गेले असल्याचा आरोपही प्रवीण यादव यांनी केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06323 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..