
मेट्रोकडून २० कोटींची ऊर्जानिर्मिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो वन मार्गावर मुंबई मेट्रो वन कंपनीने ‘गो ग्रीन गो क्लीन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या सहा वर्षांत या उपक्रमाच्या माध्यमातून मेट्रो वन कंपनीने २० कोटी रुपये किमतीची सुमारे २० दशलक्ष युनिट वीज निर्माण केली आहे. स्थानके, कारशेडसाठी दरमहा लागणाऱ्या विजेपैकी सुमारे चार लाख युनिट वीज सौरऊर्जेतून मिळविण्यात कंपनीला यश आले आहे.
मेट्रो वन कंपनीने तीन एमडब्ल्यूपी सौरऊर्जा निर्मितीसाठी २०१६ मध्ये गो ग्रीन गो क्लीन हा उपक्रम हाती घेतला. हा प्रकल्प २०१७ मध्ये सर्व १२ स्थानकांवर आणि २०१८ मध्ये डेपोवर कार्यान्वित करण्यात आला. तेव्हापासून मेट्रो वन ने २० कोटी रुपये किमतीची सुमारे २० दशलक्ष युनिट वीज निर्माण केली आहे. मेट्रो वन ने ८ हजार ९८७ सोलर पॅनल्स बसवले आहेत. या माध्यमातून लाईट, वातानुकूलित, लिफ्ट, एस्केलेटर, पंप इत्यादीसाठी वीज उपलब्ध होत आहे. मेट्रो वनची विजेची मासिक गरज सुमारे २४ लाख युनिट आहे. त्यापैकी चार लाख युनिट वीज सौरऊर्जेद्वारे प्राप्त करण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलाची सुमारे वार्षिक दोन कोटी रुपयांची बचत होत आहे. सौरऊर्जेच्या चार लाख युनिटपैकी १२ स्थानकांमधून तीन लाख ३० हजार युनिट आणि डेपोच्या छतावरून ७० हजार युनिटची निर्मिती होत आहे.
...
विविध उपाययोजना
त्याचप्रमाणे कंपनीने गेल्या पाच वर्षांत पारंपरिकवरून एलईडीमध्ये लाईट सिस्टीम बदलणे, स्लीप मोडवर एस्केलेटर लावणे, ऑटोमॅटिक टाईमर बसवणे, गरज नसताना पॉवर बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना शिक्षित करणे अशा अनेक वीजबचत उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपायांच्या अंमलबजावणीमुळे प्रतिवर्ष १.१ कोटी रुपयांची अतिरिक्त विजेची बचत झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06324 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..