इंद्राणी मुखर्जीची जातमुचलक्यावर सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्राणी मुखर्जीची जातमुचलक्यावर सुटका
इंद्राणी मुखर्जीची जातमुचलक्यावर सुटका

इंद्राणी मुखर्जीची जातमुचलक्यावर सुटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शीना बोरा हत्या खटल्यात जामीन मंजूर झालेल्या प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला विशेष सीबीआय न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश गुरुवारी दिले. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी इंद्राणीला जामीन मंजूर केला आहे. याबाबत आज तिच्या वतीने ॲड. सना यांनी जामीन शर्ती निश्चित करण्यासाठी अर्ज केला. यावर न्यायालयाने तिला दोन लाख रुपयांच्या व्यक्तिगत हमीपत्रावर जामीन मंजूर केला आहे.

येत्या पंधरा दिवसांत तिला ही रक्कम रोख स्वरूपात जमा करावी लागेल. त्यानंतर न्यायालय तिच्या सुटकेची पुढील कार्यवाही सुरू करेल. सहआरोपी पीटर मुखर्जीला ज्या जामीन अटी मंजूर केल्या आहेत, त्या इंद्राणीलाही लागू कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इंद्राणी मागील साडेसहा वर्षांपासून भायखळा महिला कारागृहात आहे. या खटल्याचे काम सुरू असले, तरी अद्याप खटला पूर्ण व्हायला बराच अवधी जाणार आहे, त्यामुळे तिला जामीन मंजूर करत आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

शीना ही इंद्राणीची मुलगी होती. या हत्येच्या कटात तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि वाहनचालक शामवर राय यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच हत्येबद्दल माहिती असल्याचा आरोप इंद्राणीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जीवर सीबीआयने ठेवला आहे. पीटरला यापूर्वी जामीन मंजूर झाला आहे.

२०१५ मध्ये गुन्हा उघड
शीनाची हत्या इंद्राणी आणि अन्य आरोपींनी मे २०१२ मध्ये केली आणि तिचा मृतदेह पेणच्या जंगलात जाळून टाकला. मात्र २०१५ मध्ये हा गुन्हा उघड झाला आणि पोलिसांनी इंद्राणीला अटक केली. तेव्हापासून ती कारागृहात आहे. वैद्यकीय कारणांमुळे तिने उच्च न्यायालयात जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती; मात्र ही मागणी नामंजूर झाल्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.