बाबासाहेबांचा पुतळा नियोजित वेळेत पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबासाहेबांचा पुतळा नियोजित वेळेत पूर्ण करा
बाबासाहेबांचा पुतळा नियोजित वेळेत पूर्ण करा

बाबासाहेबांचा पुतळा नियोजित वेळेत पूर्ण करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : इंदू मिलमध्ये उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळा निर्मितीचे कार्य वेळेत पूर्ण करा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. स्मारकासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक उत्तर प्रदेशातील राम सुतार आर्ट कंपनी येथे गुरुवारी पार पडली. यावेळी समितीने आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांनी गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटांची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीच्या आधारे मूळ पुतळा उभारण्यात येत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रतिकृतीची पाहणी केली. पाहणीनंतर राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना प्रतिकृतीतील आवश्यक रेखीव बाबींविषयी काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार एमएमआरडीए, जे. जे स्कूल ऑफ आर्ट, आय.आय. टी बॉम्बेची तज्ज्ञ मंडळी आणि स्मारक सल्लागारांच्या मार्गदर्शनाच्या आधारे प्रतिकृतीत आवश्यक बदल करून मूळ पुतळ्याचे काम सुरू करावे, असे निर्देश मुंडे यांनी बैठकीत दिले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंते प्रकाश भांगरे, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, शापुरजी पालनजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, शशी प्रभू ॲण्ड असोसिएट्सचे प्रकल्प सल्लागार अतुल कविटकर आदी उपस्थित होते.

२०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
धनंजय मुंडे यांनी या वेळी सांगितले की, राम सुतार आर्ट कंपनीत पुतळ्याची प्रतिकृती तयार केली आहे. त्यात आजच्या बैठकीत काही बदल सुचवले गेले. बदलाअंती उपसमितीच्या मंजुरीनंतर मूळ पुतळा निर्माण कार्यास सुरुवात होईल. मार्च २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.