
ई-बस पुरवठादार ब्रिटिश कंपनीला दिलासा नाही
मुंबई - इलेक्ट्रिक बसपुरवठासंबंधी निविदा प्रक्रियेतून तांत्रिक मुद्द्यांवर बाद केलेल्या ब्रिटीश कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही अंतरिम दिलासा मिळाला नाही. ब्रिटीश कंपनी कौसिस ई- मोबिलिटी प्रा. लिमिटेड या कंपन्यांच्या कन्सोर्टियमने बेस्टच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. बेस्टने सुमारे १४०० इलेक्ट्रिक बससाठी निविदा काढल्या आहेत. यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असे कारण देऊन बेस्टने याचिकादार कंपनीची निविदा अमान्य केली आहे.
याविरोधात या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. अनिल मेनन आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे मागील आठवड्यात यावर सुनावणी झाली. निविदा दाखल करणाऱ्या कंपन्यांनी आतापर्यंत केलेले काम आणि पुरवठा कशा प्रकारे करणार, याचा तपशील बेस्टने मागवला होता. यानुसार याचिकादार कंपनीची तूर्तास देशात उत्पादन कंपनी उपलब्ध नाही. अन्य एका भारतीय कंपनीमार्फत ते ही निविदा पूर्ण करणार आहेत, असे सांगण्यात आले.
मात्र, बेस्टच्या शर्तीनुसार निविदा दाखल करणाऱ्या कंपनीचे उत्पादन भारतात असायला हवे. तसेच जी कंपनी याचिकादार ब्रिटिश कंपनीला पुरवठा करणार होती, ती त्यांच्या कन्सोर्टियममध्ये सदस्य नाही. त्यामुळे बेस्टने निविदा अमान्य केली आहे. खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य केला आणि अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. इलेक्ट्रिक बससाठी आठ निविदा आल्या असून त्यापैकी पाच तांत्रिक कारणांमुळे नामंजूर करण्यात आल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06360 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..