मुंबईचे वैभव `खोताचीवाडी`चा मेकओव्हर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईचे वैभव `खोताचीवाडी`चा मेकओव्हर
मुंबईचे वैभव `खोताचीवाडी`चा मेकओव्हर

मुंबईचे वैभव `खोताचीवाडी`चा मेकओव्हर

sakal_logo
By

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : गिरगावमधील नयनरम्य पोर्तुगीज शैलीतील वास्तुकलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या खोताची वाडीची २०० वर्षे जुनी ओळख आणि वारसा जतन केला जाणार आहे. मुंबई महापालिका खोताची वाडीचा लवकरच आकर्षक मेकओव्हर करणार आहे. यामुळे आधुनिक काळात दक्षिण मुंबईच्या मध्यभागी असलेल्या गावठाणाची ओळख आणि तेथील रहिवाशांची संस्कृती टिकण्यास मदत होणार आहे.
--------------

मार्च २०१८ मध्ये मुंबईच्या अनोख्या वारसा वास्तूंपैकी एक असलेल्या खोताचीवाडीचा जीर्णोद्धार सुरू करण्याबाबत गंभीर चर्चा झाली. आता तीन वर्षांनंतर ते प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिका आणि खाकी हेरिटेज फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रकल्प राबवला जाणार आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये लॅबने खोताची वाडी सर्वेक्षण पूर्ण केले असून, लवकरच त्याचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यासाठी एक विस्तृत योजना तयार केली जाईल. पूर्ण झालेला आराखडा मे महिन्याच्या अखेरिस प्रशासकीय मंजुरीसाठी सादर केला जाण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण मिश्रशैलीत बांधलेल्या या घरांवर ब्रिटिश तसेच पोर्तुगीज वास्तुशास्त्रीय प्रभाव जाणवतो. हाच वारसा ओळखून मुंबई पालिकेच्या डी प्रभागातर्फे ‘खोताची वाडी वेल्फेअर अँड हेरिटेज ट्रस्ट’सोबत जीर्णोद्धार योजना आणली. तीन वर्षांपूर्वी तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात या वारसा परिसराच्या प्रवेशद्वाराचे पुनर्निर्माण करण्यावर भर देण्यात आला होता. माहिती फलकांसह ऐतिहासिक खुणा चिन्हांकित करणे, विशेष चिन्हे तयार करणे आणि स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून या परिसराला अनोखे रूप देणे हा या योजनेचा महत्त्वाचा भाग होता. तथापि, या पारंपरिक घटकांचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच, आधुनिक सुविधादेखील पुरवायच्या आहेत. ज्यामध्ये गल्ल्या आणि मार्गांची दुरुस्ती, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन सुधार यांचा समावेश आहे. वारसा संवर्धन धोरण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश परंपरेचे जतन करणे हा आहे.

वैभव झाकले गेले...
१) जुन्या दक्षिण मुंबईच्या मध्यभागी असलेल्या गिरगावातील खोताची वाडी ही २०० वर्षे जुनी वस्ती आहे. एकेकाळी येथील ६५ घरे-बंगले, कॉटेज आणि एक मजली बांधकामे यांनी या भागावर वर्चस्व गाजवत ओळख निर्माण केली; परंतु आता त्यातील फक्त २५ बांधकामे उरली आहेत. आसपास नव्याने उभ्या राहिलेल्या उंच इमारतींमुळे त्याचे वैभव झाकले गेले आहे.
२) काही जुन्या बांधकामांमध्ये आता बदलही झाले आहेत. असे असले, तरी मुख्य रस्त्यावरून आणि खोताची वाडीच्या गल्ल्यांमध्ये गेल्यावर जादुई अनुभव आल्यावाचून राहत नाही. वाडीतील गल्ल्या अरुंद आणि वळणदार आहेत, तर घरे शेजारील घराच्या व्हरांड्यावर बसून एकमेकांशी संवाद साधू शकतील, इतकी जवळ आहेत. सुशोभित लोखंडी बाल्कनी, जाळीदार व्हरांडा, मोझॅक फ्लोअरिंग, गॅबल्ड छप्पर, कोरीव लाकडी जिने ही काही स्थापत्यशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत.

वैभवशाली इतिहास वाचविण्याची धडपड
१) खोताची वाडीमधील घरे ही खासगी मालमत्ता आहेत. त्यामुळे मालकांनी त्यांची देखभाल करणे आवश्यक आहे. असे असले तरी बाहेरचा परिसर, गल्ल्या महापालिका अधिनियमाच्या अधीन आहेत. त्यामुळे येथील दृश्य, वैभवशाली इतिहास वाचविण्यासाठी पालिकेने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी हा स्थानिक नगरसेवकांच्या निधीतून मिळविण्यात येणार आहे.
२) खरेतर हे काम दोन वर्षांपूर्वीच सुरू होणार होते; परंतु कोविड साथीच्या आजारामुळे जीर्णोद्धाराचे काम रखडले. आता पुन्हा हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून १९व्या शतकाची आठवण करून देणाऱ्या या परिसरात योग्य प्रकाशयोजना सुरू करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पदपथ आणि लेन पृष्ठभागांच्या पुनर्बांधणीचे काम पुढे हाती घेण्यात येईल.
३) पूर्वी वर्षातून एकदा खोताचीवाडी महोत्सव भरवला जायचा, ज्यामध्ये रहिवासी आपली घरे पाहुण्यांसाठी उघडत असत. घरातील उत्पादने जसे, की मल्ड वाईन, केक, लोणचे आणि प्रसिद्ध ईस्ट इंडियन बाटली मसाला ते सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर जेम्स फरेरा यांनी बनवलेल्या शोभिवंत कपड्यांपर्यंत सर्व काही महोत्सवात असायचे. ही लोप पावत चाललेली संस्कृती पुन्हा जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

खोताची वाडी या हेरिटेज परिसराच्या पुनरुज्जीवनाची योजना महापालिकेने हाती घेतली असून ती सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. पालिकेने नियुक्त केलेल्या संवर्धन आर्किटेक्ट यांच्याकडून मसुदा आराखडा सादर केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
डी-वॉर्डचे सहाय्यक आयुक्त
- प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त, ड प्रभाग

...असे पडले नाव
खोताची वाडी या नावाला एक साधा इतिहास आहे. शेतसारा गोळा करण्यासाठी खोत नियुक्त केले जात. अशाच एका खोत नावाच्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने १८ व्या शतकात केव्हा तरी ही जमीन पूर्व भारतीयांना विकली होती. त्यामुळे या परिसराला खोताची वाडी असे संबोधले जाऊ लागले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06364 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..