
बदलत्या जीवनशैलीने आरोग्याची जोखीम अधिक
मुंबई - पूर्वी हृदयविकाराच्या समस्या प्रामुख्याने पन्नाशीच्या पुढील वयोगटात दिसत होत्या. सध्या ३० आणि ४० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तीही हृदयविकाराने त्रस्त असल्याचे दिसते. तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार अशा अयोग्य जीवनशैलीमुळे असे धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातही टाईप २ मधुमेह आणि सातत्याने बदलणारी जीवनशैली सर्वात मोठ्या जोखीम घटकांपैकी एक ठरत आहे.
अलीकडेच मध्य प्रदेशातील एका ७६ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. तिथे त्यांची अँजिओग्राफी झाली. डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. अँजिओग्राफीनंतर आठवडाभरात त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण शस्त्रक्रियेबद्दलची भीती लक्षात घेता ते बायपासचा पर्याय निवडण्यास तयार नव्हते. त्यांचे हृदयाचे पम्पिंगही २५ टक्के होते. कोणत्याही प्रक्रियेच्या परिणामासाठी ते जोखमीचे होते. बायपास शस्त्रक्रियाचाच एकमेव पर्याय होता.
डॉक्टरांनी त्यांच्यावर मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीद्वारे (एमआयएस) बायपास शस्त्रक्रिया केली. ज्या रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य चांगले असते आणि ज्यांना हृदयाच्या आत ३-४ ब्लॉकेज असतात, त्यांची शस्त्रक्रिया स्तनाच्या हाडातून एक लहान चिर देऊन यशस्वीपणे केली जाते. मध्य प्रदेशातील ७६ वर्षीय व्यक्तीची शस्त्रक्रियाही मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीद्वारे करून त्याला पाचव्या दिवशीच डिस्चार्ज मिळाला. शिवाय त्याला कोणताही त्रास न होता तो रुग्ण बरा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ४० ते ६९ वयोगटातील भारतीय प्रौढांच्या मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आहेत. अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याबाबत जागरुकता अधिक निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हृदयविकारावर ओपन हार्ट सर्जरीपेक्षा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करत असताना छातीवर एक लहान चिर असतो, ज्यामुळे छातीचे हाड कापण्याऐवजी फासळ्यांमधील हृदयापर्यंत पोहोचतो. ही प्रक्रिया सुरक्षित आहे आणि कमी जोखमीसह अधिक यशस्वी होते.
- डॉ. मंगेश कोहले, कार्डियक सर्जन
...अशी घ्या काळजी
१) हृदयरोगींना कधीकधी वेगवान किंवा मंद हृदयाच्या ठोक्याची, याशिवाय उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवते. अशा वेळी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आहारातून काही पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहेत; अन्यथा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, कार्डियाक अरेस्ट आणि स्ट्रोक यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. निरोगी हृदयासाठी मीठ, साखरयुक्त गोड पदार्थ, मैदा, अंड्यातील पाढरा बलक आदी पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन केले जात आहे.
२) हृदय आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मीठ मर्यादित प्रमाणात खावे. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब होतो आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. साखर जास्त खाल्ल्यास शरीरातील इन्सुलिन वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. मैदा खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कॉलेस्ट्रॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. अंड्यातील पांढऱ्या बलकमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. हृदयरोग्यांनी हळूहळू अंडी खाणे कमी करावे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06381 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..