
ठाणे विद्यासेवक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत भाजप शिक्षक आघाडीचा धुव्वा
शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत
भाजप शिक्षक आघाडीचा धुव्वा
विद्यासेवक पॅनेलच्या सर्वच उमेदवारांचा विजय
मुंबई, ता. २२ : ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत भाजप शिक्षक आघाडीचा धुव्वा उडवून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना आणि शिक्षक सेनेच्या विद्यासेवक पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या पॅनेलचे सर्वच्या सर्व १५ संचालकपदांचे उमेदवार निवडून आले असून भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक परिषदेच्या उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काळात ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढीवर शिक्षण क्रांती संघटनेचे वर्चस्व होते. त्याविरोधात एकीकडे शिक्षक परिषद आणि दुसरीकडे भाजप शिक्षक आघाडीने पतपेढीच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रचारकाळात विद्यमान संचालकांविरोधात प्रचार केला गेला होता. मात्र शिक्षक मतदारांनी त्याला बळी न पडता शिक्षण क्रांतीचे अध्यक्ष सुधीर घागस आणि शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील विद्यासेवक पॅनेलला जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहेत. त्यामुळे कोकण शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत परिषदेच्या काही धुरिणांनी तत्कालीन शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना उमेदवारी डावलून त्यांचा पराभव करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले होते. त्यामुळे मोते यांचा पराभव ठाणे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना जिव्हारी लागला होता. त्याचा हिशेब शिक्षकांनी या पतसंस्थेच्या निवडणुकीत चुकता केला असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक मतदारांनी दिल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06392 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..