
विद्यार्थी गिरवणार हायटेक धडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बायजूस संस्थेचे ‘लर्निंग ॲप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण खात्याच्या अखत्यारितील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाचे हायटेक धडे गिरविण्याचा अनुभव मिळणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्य करणारी बायजूस संस्था व मुंबई पालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, टॅब, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, ऍस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत- कला- क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे अध्ययन व अध्यापन अविरतपणे करण्यात येत आहे. याच शृंखलेत बायजूस या संस्थेसोबतच्या सामंजस्य कराराच्या निमित्ताने आणखी एक पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होईल.
दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) हा करार करण्यात आला. या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग आणि खनिकर्म खात्याचे मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह आणि बायजूस संस्थेचे बायजू रविंद्रन हे दावोसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते. मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असे पालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कळवण्यात आले.
शिक्षकांनाही प्रशिक्षण
विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासह पालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करणाऱ्या शिक्षकांना देखील बायजूस संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांना आता हायटेक शिक्षण उपलब्ध होतील. तसेच यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांनी अधिक प्रभावीपणे हायटेक शिक्षण देऊ शकतील.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06439 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..