
मुंबईतील झोपड्या झोपडपट्टी क्षेत्र घोषित होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) कंबर कसली आहे. त्यानुसार खासगी किंवा सरकारी जमिनीवर वसलेल्या झोपड्यांना झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. यासाठी खासगी किंवा सरकारी जमीन मालकांकडून हरकती मागविल्या आहेत. एका महिन्याच्या आत या अधिसूचनेवर हरकती नोंदवता येणार आहेत. यानंतर मुंबईतील झोपड्या झोपडपट्टी क्षेत्र घोषित होणार असून यामुळे एसआरए योजना जाहीर करण्याचा दोन ते तीन महिन्यांचा वेळ वाचणार आहे.
राज्य सरकारने २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले आहे. तसेच २०११ पर्यंतच्या झोपड्यांतील रहिवाशांना बांधकाम खर्च आकारून घर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात अनेक झोपडपट्ट्या आहेत. या झोपड्या खासगी तसेच सार्वजनिक प्राधिकरणांच्या मालकीच्या जमिनींवर अस्तित्वात आहेत. यातील अनेक झोपड्यांना एसआरएने यापूर्वी झोपडपट्टी क्षेत्र जाहीर केले आहे. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार एसआरए योजनांना गती देण्यासाठी झोपडपट्टी असलेल्या भागाला झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसआरए प्राधिकरणाने झोपड्यांना झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. याबाबत जमीन मालकाला किंवा खासगी मालकाला काही आक्षेप असल्यास अधिसूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत या प्राधिकरणाकडे लेखी सादर करावे लागणार आहे. या कालावधीनंतर कोणतीही हरकत घेतली जाणार नाही, असे एसआरएने या अधिसूचनेत म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06447 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..