
साकीनाका बलात्कारप्रकरणी आरोपीवर दोषारोप पत्र
मुंबई, ता. ३० : मागील वर्षी साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या खटल्यात दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहान (४५) याला दोषी जाहीर केले आहे. आरोपीच्या शिक्षेवर बुधवारी (ता. १) युक्तिवाद होणार आहे.
आरोपी चौहानने पीडित महिलेवर एका वाहनात बलात्कार केला होता. त्याने तिला गंभीर जखमीही केले होते. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले; परंतु मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्रावामुळे दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला होता. दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर घडलेल्या भयानक घटनेमुळे खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनेनंतर १८ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्या. एच. सी. शेंडे यांच्यापुढे खटल्यावर सुनावणी झाली. अभियोग पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. राजा ठाकरे आणि महेश मुळे यांनी बाजू मांडली.
मोहनला न्यायालयाने हत्या, कट-कारस्थान, बलात्कार, फसवणूक इत्यादी आरोपांत दोषी ठरवले आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा आणि ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गतही त्याला न्यायालयाने दोषी जाहीर केले आहे. आरोपीच्या शिक्षेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यार पोलिसांनी तपासात ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही न्यायालयात साक्ष दिली.
काय होती घटना?
अभियोग पक्षाच्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये साकीनाका परिसरातील एस. जे. फिल्म स्टुडिओजवळ पीडित महिला आरोपीला भेटली होती. तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली. आरोपीने तिला मारहाण केली. त्यानंतर त्या बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला गंभीर जखमी करून रक्ताच्या थारोळ्यात टाकून तो फरार झाला होता. तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद झाला होता. गंभीर जखमी झाल्यामुळे ती पोलिसांना जबाब देऊ शकली नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06529 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..