
मुंबईत घर खरेदीत ७८ टक्क्यांची वाढ
मुंबई - कोरोनाचे सावट दूर होताच मुंबईत घर खरेदीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा मुंबईत घर खरेदीमध्ये ७८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. मुंबईत मे महिन्यात यंदा नऊ हजार ५२३ घरांची विक्री नोंदवली गेली. गेल्या वर्षी हाच आकडा पाच हजार ३६० इतका होता. मालमत्ता सल्लागार ‘नाईट फ्रँक इंडिया’च्या पाहणीतून हा निष्कर्ष समोर आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्व क्षेत्रावर विपरित परिणाम झाला होता. त्यातून गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने २०२१ मध्ये मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा घेत ग्राहकांनी मोठ्या आकाराच्या घर खरेदीला पसंती दर्शवली. गेल्या वर्षी मे २०२१ मध्ये मुंबई पालिका हद्दीत पाच हजार ३६० घरांची खरेदी झाली होती. यंदाच्या वर्षी मे महिन्यात नऊ हजार ५२३ घरांची विक्री झाली आहे.
मुंबईच्या प्राथमिक गृहनिर्माण बाजारपेठेत मॅक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा समूह), गोदरेज प्रॉपर्टीज, ओबेरॉय रियल्टी, हिरानंदानी समूह, कल्पतरू लिमिटेड, टाटा हाऊसिंग, शापूरजी पालोनजी, पिरामल रियल्टी, महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स, रुस्तमजी समूह आणि के रहेजा समूह यांना घर खरेदीदारांनी प्राधान्य दिले आहे.
निर्बंध उठवल्याने खरेदी वाढली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात घर खरेदी कमी झाली; परंतु यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने मे महिन्यात घर खरेदी वाढल्याचे नाइट फ्रँक संस्थेने म्हटले आहे. महागाई, वाढता खर्च आणि मुद्रांक शुल्कात वाढ यांचा दबाव असूनही मुंबईतील बांधकाम क्षेत्र स्थिर असल्याचे नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06563 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..