
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका ‘अलर्ट’ मोडवर
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर शहरात कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुंबई महापालिका प्रशासन ‘अलर्ट मोड’वर गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला आणि सर्व संबंधित विभाग व खात्यांना दक्ष राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. कोविड रुग्णवाढ गांभीर्याने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शहरातील जम्बो कोविड केंद्रेही सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत जगातील विविध देशांमध्ये कोविडचे नवीन उपप्रकार आढळले असून संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई महानगरातही अलीकडे कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढते आहे. मुंबईत कोविड लसीकरण व्यापक स्तरावर झाले असले, तरी गाफील न राहता काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू होण्याच्या बेतात असल्याने रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेची आरोग्य यंत्रणा, सर्व संबंधित खाते आणि विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा खंबीरपणे सामना करतानाच मुंबई महानगरात कोविड प्रतिबंधक लसीकरणही वेगाने करण्यात आले आहे. सर्व पात्र घटकांपर्यंत लसीकरण मोहीम पोहोचल्याने कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव अतिशय सौम्य स्तरावरच रोखण्यात पालिकेला यश आले. त्याचप्रमाणे सध्या सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कामाला लागा, असे निर्देश चहल यांनी दिले आहेत.
जम्बो कोविड केंद्रांनी सज्ज राहावे
अतिरिक्त पालिका आयुक्तांनी आपापल्या अखत्यारीतील क्षेत्रांमध्ये असलेल्या जम्बो कोविड रुग्णालयांना भेट देऊन उपाययोजनांबाबत खातरजमा करावी. पावसाळी उपाययोजनांच्या दृष्टीने जम्बो कोविड केंद्रांमध्ये पर्जन्य जल उदंचन यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी, औषधसाठा आणि वैद्यकीय सामग्री, प्राणवायू, आहार, स्वच्छता इत्यादींशी निगडित सर्व बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्या सुस्थितीत कार्यान्वित आहेत याची खातरजमा करावी, असेही आयुक्तांनी आपल्या निर्देशांमध्ये नमूद केले आहे.
पालिकेचे कोविड प्रतिबंधक निर्देश
- कोविड चाचण्या युद्धपातळीवर वाढवाव्यात. त्यासाठी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा मनुष्यबळासह सुसज्ज असाव्यात
- १२ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र मुला-मुलींच्या कोविड लसीकरणास वेग द्यावा. बूस्टर डोस घेण्यास पात्र नागरिकांना प्रवृत्त करावे
- जम्बो कोविड रुग्णालयांनी सतर्क राहावे. तेथे पुरेशा संख्येने मनुष्यबळ तैनात करावे
- सहायक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रूममध्ये पुरेसे वैद्यकीय व इतर कर्मचारी आणि रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याचा आढावा घ्यावा
- खासगी रुग्णालयांनाही सतर्क राहण्याविषयी सूचना द्याव्यात
- रुग्णांची संख्या वाढू लागली तर त्यांना प्राधान्याने मालाडमधील जम्बो कोविड रुग्णालयात दाखल करावे
- सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात दैनंदिन कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात
- अतिरिक्त पालिका आयुक्तांनी जम्बो कोविड रुग्णालयांना भेट देऊन पावसाळी परिस्थितीसाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घ्यावा
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06570 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..