सचिन वाझे माफीची साक्षीदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन वाझे माफीची साक्षीदार
सचिन वाझे माफीची साक्षीदार

सचिन वाझे माफीची साक्षीदार

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील खंडणीवसुलीच्या खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेची मागणी आज विशेष सीबीआय न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे.

वाझेने खटल्यातील सत्य तपशील उघड करावा, कोणतीही बाब वा घटना दडवून ठेवू नये आणि पुरावे बाधित करू नयेत, तरच त्याला माफी मिळेल, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने दिली आहे. विशेष म्हणजे देशमुख यांच्याविरोधात असलेल्या मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणातही माफीचा साक्षीदार होण्याची मागणी वाझेने ईडीकडे केली आहे.

विशेष न्यायालयात गेल्या बुधवारी वाझेच्या वतीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करण्यात आला. माझ्या अटकेपूर्वी आणि नंतरही नेहमीच मी सीबीआयला तपासात सहकार्य केले. फौजदारी दंडसंहिता कलम १६४ नुसार जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे फौजदारी दंडसंहितेच्या कलम ३०६ नुसार मला माफीचा साक्षीदार करावे आणि जबाब नोंदवण्यात यावा, अशी मागणी त्याने केली होती. विशेष न्या. डी. पी. शिंगाडे यांनी ती मान्य केली. सीबीआयने मागणीला सशर्त सहमती दिली आहे. त्यामुळे आता वाझे सीबीआयचा साक्षीदार म्हणून जबानी नोंदवणार आहे.

सीबीआयने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये देशमुख, वाझे आणि अन्य काही जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पदाचा गैरवापर करून हॉटेलचालकांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. त्याचबरोबर देशमुख यांच्यावर पोलिस बदलीतील गैरव्यवहाराबाबतही गुन्हा दाखल आहे. एनआयएने प्रथम मार्चमध्ये त्याला अटक केली होती. देशमुख यांच्या सांगण्यावरून वाझे खंडणी वसूल करत असे, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. वाझेच्या अर्जाला अन्य आरोपींनी विरोध केला होता; मात्र तो अमान्य करण्यात आला.

अन्य तीन गुन्हे दाखल
सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर अन्य तीन गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा खंडणीवसुलीबाबत आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे प्रमुख आरोपी आहे. ख्वाजा युनुस चकमक प्रकरण प्रलंबित आहे. तब्बल १५ वर्षांनंतर वाझे पुन्हा पोलिस दलात सहभागी झाला होता; मात्र हाय प्रोफाईल प्रकरणे आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून त्याची ओळख होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06575 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top