
रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरएने वित्तीय संस्थांकडून मागविले प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : शहर आणि उपनगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) वित्तीय संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. एसआरए प्रकल्पांना अर्थसाह्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना ७ जून ते २१ जुलैपर्यंत एसआरएकडे याबाबत स्वारस्य अर्ज सादर करावा लागणार आहे. नोटाबंदी, कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेची घडी मंदावली. यामुळे विकसकांनी हाती घेतलेले एसआरए प्रकल्प रखडले. याचा झोपडीधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली. यानंतरही विकसकांनी प्रकल्पांचे काम हाती न घेतल्याने सरकारने अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभय योजना लागू केली आहे.
अनेक वित्तीय संस्थांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना वित्तपुरवठा केला आहे. तरीही संबंधित विकसक योजनांमधील पुनर्वसन घटक पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहेत. तसेच या विकसकांनी झोपडपट्टी रहिवाशांचे पर्यायी वास्तव्याचे भाडे देणे बंद केले आहे. विकसकांच्या अपयशामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये प्रगती होत नसल्याने वित्तीय संस्थांचेही मोठे नुकसान होत आहे. या वित्तीय संस्था झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रेकॉर्डवर नाहीत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अशा वित्तीय संस्थांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास परवानगी देऊ शकत नव्हते. त्यामुळे अशा झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडपट्टीवासीयांचे हित लक्षात घेऊन वित्तीय संस्थांना त्यांनी वित्त मंजूर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी पुढे येण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार एसआरएने स्वारस्य असलेल्या वित्तीय संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. ७ जून ते २१ जुलै या कालावधीत संस्थांना असे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06607 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..