
मान्यता न घेतलेल्या शाळांवर कारवाई करा
मुंबई, ता. २ : शालेय शिक्षण विभागाची आणि स्थानिक प्रशासनाची कोणतीही मान्यता न घेता मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या शाळांवर तातडीने कारवाई केली जावी, अशा सूचना राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आज केल्या आहेत.
राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १३ जूनपासून होत असून त्याच दिवशी शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी मान्यता न घेता खासगी व्यवस्थापनाच्या शाळा सुरू असून त्याची यादी शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर केली जात आहे. तरीही काही पालक अशा शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेत असल्याने त्याची गंभीर नोंद आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. पालकांनी आपल्या मुलाचा मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्यावा. एखाद्या नवीन शाळेच्या जाहिरातींवर भुलून न जाता शिक्षण विभागाकडे त्याबाबत खातरजमा करूनच आपल्या पाल्याला प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण आयुक्त मांढरे यांनी केले आहे. मुंबईतील २६९ बेकायदा शाळांची यादी पालिकेने जाहीर केली असून अशा प्रकारच्या राज्यभरात सुरू असलेल्या इतर सर्व शाळांवार कारवाई केली जाणार असल्याचे मांढरे म्हणाले.
कारवाईचा बडगा
गेल्या आठवड्यात मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शासन मान्यतेशिवाय सुरू असलेल्या २६९ बेकायदा शाळांची यादी जाहीर केली होती. राज्यभरातील अशा बेकायदा शाळांवर लवकरच कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (१) नुसार शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्राधिकरणाची मान्यता घेणे आवश्यक आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06608 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..