
पीएमएवायची घरे गिरणी कामगार नाकारणार?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पंतप्रधान आवास योजनेमार्फत खासगी विकसकांनी हाती घेतलेल्या गृहप्रकल्पांतील घरे गिरणी कामगारांना देण्याचा विचार गृहनिर्माण विभागाने केला आहे. गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना हे प्रकल्प प्रत्यक्ष ठिकाणी नेऊन गेले दोन दिवस दाखवण्यात आले. मात्र काही प्रकल्प रेल्वेस्थानकापासून बरेच दूर असल्याने ही घरे नाकारण्याचा विचार संघटना करत आहेत. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गिरणी कामगारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन एमएमआर क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या ७० हजार घरांबाबत माहिती दिली होती. तसेच या घरांची जागा पाहून येण्याची सूचनाही त्यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना केली होती. त्यानुसार म्हाडामार्फत प्रतिनिधींसाठी गेले दोन दिवस प्रकल्पांचा पाहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी (ता. ३) कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी वसई, पालघर आदी परिसरांतील घरांची पाहणी केली; तर गुरुवारी (ता. २) वांगणी, शिरढोण येथील घरांचे प्रकल्प दाखवले. मात्र, बहुतांश प्रकल्प रेल्वेस्थानकापासून दूर असल्याने प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वसई येथील घरे रेल्वेस्थानकापासून जवळ असल्याने ही घरे कामगारांच्या पसंतीस उतरतील. मात्र इतर ठिकाणची घरे घेण्यास सहमती दर्शवायची की नाही याबाबत कामगारांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर संघटना निर्णय जाहीर करेल, असे गिरणी कामगार नेत्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06641 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..