मुंबई : विरारच्या ज्युली बेटावर ‘इको टुरिझम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eco Tourism Julie Island
विरारच्या ज्युली बेटावर ‘इको टुरिझम’

मुंबई : विरारच्या ज्युली बेटावर ‘इको टुरिझम’

मुंबई : मुंबईला लागूनच असलेल्या विरारजवळील खाडीमध्ये असणाऱ्या ज्युली बेटावर ‘इको टुरिझम’ म्हणजेच ‘निसर्ग परिचय केंद्र’ उभारण्यात येत आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ जूनपर्यंत हे बेट पर्यटकांसाठी खुले करण्याचा मानस आहे. या केंद्रामुळे येथील कांदळवनांसह जैवविविधतेची ओळख येथे येणाऱ्या पर्यटकांना होणार असून, यामुळे ‘इको टुरिझम’लाही चालना मिळणार असल्याची माहिती मँग्रोव्हज सेलचे अतिरिक्त मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.

विरार पश्चिमेला चिखल डोंगरी गावाजवळ मरंबल पाडा आहे. या मरंबल पाड्याजवळच हे ज्युली बेट असून, हा भाग आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. विरारच्या खाडीमध्ये ज्युली बेट असून या बेटाच्या चारही बाजूला कांदळवनांचे जंगल आहे. याच खाडीमध्ये ‘एमएमबी’ची जुनी जेटी असून बाजूलाच नवीन जेटीचे बांधकामदेखील सुरू आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा वावर वाढत आहे. हा परिसर निसर्गरम्य आणि जैवविविधतेने संपन्न असल्याने या ठिकाणी इको टुरिझम केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्युली बेटाच्या आसपास कांदळवनाचे मोठे आच्छादन आहे. या ठिकाणी ११ पेक्षा अधिक प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामुळे कांदळवनांची माहिती जाणून घेणे किंवा त्यांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. कांदळवनांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे नैसर्गिक मार्ग तयार झाले आहेत. बोट सफारीच्या माध्यमातून त्यातून प्रवास करणे किंवा ओहोटीच्या वेळी ते मार्ग न्याहाळणे एक वेगळाच आनंद देऊन जाणार आहे. यासाठी मँग्रोव्हज फाऊंडेशनने बोटीची व्यवस्थाही केली आहे.

किनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्मिळ प्राणी आणि पक्षी आढळून येतात. २५ पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळून आल्या आहेत. त्यांचे निरीक्षण करण्यासाठी ‘पक्षी निरीक्षण मनोरा’ उभारण्यात आला आहे. या शिवाय बेटावर कोल्हे देखील सहज बघायला मिळतात. पर्यटकांना त्यांचे निरीक्षण करण्यासाठी काही सुरक्षित जागा तयार करण्यात आल्या आहेत. किनारपट्टी परिसरात आढळून येणारे शंख-शिंपलेदेखील येथील वैशिष्ट्य आहे. हे शंख शिंपले आसपासच्या समुद्रकिनाऱ्यावर बघायला मिळत नाही. त्यामुळे शंख-शिंपल्यांची निर्मिती, त्यांचे विविध प्रकार यांची माहितीदेखील येथे मिळणार आहे.

निसर्ग परिचय केंद्राची सुविधा
ज्युली येथील नैसर्गिक ठिकाणे आणि जैवविविधता यांची माहिती देण्यासाठी ‘निसर्ग परिचय केंद्र’ सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बांधकामाशिवाय कंटेनर बॉक्सचा वापर करून केंद्र उभारण्यात येत आहे. केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून पर्यटकांना सर्व माहिती दिली जाणार आहे. यासाठी तेथील स्थानिक राहिवाशांचा उपयोग केला जाणार आहे.

४० लाखांचा खर्च
ईको टुरिझमसाठी एकूण ४० लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. यासाठी काही खासगी संस्थांची मदतही घेण्यात आली आहे. एकूण खर्चापैकी १५ लाख रुपयांचा खर्च हा इनरव्हील क्लब करणार असून उर्वरित खर्च मँग्रोव्हज फाऊंडेशनचा असणार आहे.

बोट सफारीचा घ्या आनंद
ज्युली येथील ग्रामस्थांना एक बोटदेखील उपलब्ध करण्यात येणार असून त्या माध्यमातून पर्यटकांना बोट सफारीचा आनंद घेता येणार आहे. यासाठी १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यातील १० टक्के म्हणजे १ लाख रुपये ग्रामस्थांना उभे करावे लागतील; तर ९ लाख रुपये मँग्रोव्हज फाऊंडेशनकडून दिले जाणार आहेत.

जिताडा, लाल भातावर मारा ताव
भातशेती आणि जिताडा पालन हा येथील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय आहे. महत्त्वाचे म्हणजे येथील शेतकरी पारंपरिक लाल भाताचे उत्पन्न घेतात. त्यामुळे पर्यटकांना सुगंधी लाल भाताचा आस्वाद घेता येणार आहे. मँग्रोव्हज सेल फाऊंडेशनच्या मदतीनेच स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत जिताडा पालन व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना जिताड्यावर ताव मारता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06655 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top