
कर्करोगाविरुद्ध ‘बीपीसीएल’ची तीन राज्यांमध्ये मोठी मोहीम
मुंबई, ता. ६ ः कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनतर्फे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. कर्करोग तपासणी, उपचार तसेच कर्करोगग्रस्तांचे पुनर्वसन यांचा मोहिमेत समावेश आहे. एकात्मिक कर्करोग तपासणी व उपचार असे या मोहिमेचे नाव असून ती इंडियन कॅन्सर सोसायटीच्या साह्याने राबवली जाईल. मोहिमेत कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांवर तसेच उपचारांवर भर दिला जाईल.
मोहिमेदरम्या तोंडाच्या, गर्भाशय मुखाच्या तसेच स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी शिबिरे आयोजित केली जातील. यात आढळलेल्या रुग्णांवर देशभरातील १० सरकारी तसेच स्वयंसेवी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातील. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठीही कार्यक्रम आखला जाईल.
‘बीपीसीएल’तर्फे त्यांच्या ‘उगम’ या सीएसआर उपक्रमामार्फत ही सर्व मोहीम हाती घेतली जाईल. उपचार पूर्ण करून कर्करोगावर मात केलेल्या लहानग्यांनी पुढाकार घेऊन ‘उगम’ची स्थापना केली आहे. गेली अनेक वर्षे लहान स्वयंसेवक कर्करोगाविरोधात जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहेत. या मोहिमेत ‘बीपीसीएल’तर्फे पुणे, कोल्हापूर, वाराणसी, कोलकाता येथे सातशे कर्करोग तपासणी शिबिरे घेतली जातील. त्यात दोन वर्षांत ७० हजार नागरिकांची तपासणी होईल. कर्करोगाशी लढा देऊन बरे झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी इंडियन कॅन्सर सोसायटीही वेगवेगळे कार्यक्रम करीत आहे. यात त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार, त्यांना शिक्षणासाठी साह्य तसेच त्यांना रोजगारासाठी कौशल्य देणे आदींचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06695 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..