
मलिक आणि देशमुखांच्या मतदानासाठीच्या अर्जाला विरोध
मुंबई, ता. ७ : कारागृहात असलेले बंदी मतदान करू शकत नाहीत, असा दावा प्रतिज्ञापत्राद्वारे करत ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राज्यसभा निवडणूक मतदानाला सपशेल विरोध केला आहे. बुधवारी (ता. ८) विशेष न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. ईडीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत चिंता निर्माण झाली आहे.
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम ६२ नुसार हा एक औपचारिक अधिकार आहे. मूलभूत अधिकार नाही. त्यामुळे दोन्ही आरोपी आमदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळू शकत नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मलिक आणि देशमुख यांनी एक दिवसाचा जामीन मिळण्याची मागणी न्यायालयात केली आहे. त्यावर मंगळवारी ईडीने लेखी भूमिका स्पष्ट केली.
मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने देशमुख आणि मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. मलिक सध्या वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय देखरेखीखाली मतदान करण्याची मुभा त्यांनी मागितली आहे. देशमुख यांनी पोलिस बंदोबस्त खर्च भरण्याची तयारी दर्शवून मतदानाला हजेरी लावण्यासाठी परवानगी मागितली आहे. विधानभवनात मतदान होणार असून विधानसभा सदस्य यासाठी पात्र असतात. बुधवारी विशेष न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे त्यावर सुनावणी होणार आहे.
...म्हणून मते महत्त्वाची
राज्यसभा निवडणुकीत सहा जागांवर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सामना रंगला आहे. आघाडीला सहाव्या जागेसाठी मतांची जमवाजमव करावी लागत आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मते त्यांच्यासाठी महत्त्वाची आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06753 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..