
म्हाडा मुख्यालयात अग्निशमन यंत्रणा
मुंबई, ता. १२ : वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात अखेर अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे मुख्यालयाला सुरक्षितता निर्माण झाली असून या कामासाठी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. म्हाडा मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली असून नवीन इमारतींचे वेध लागले असताना प्रशासनाने ही अग्निशमन यंत्रणा बसवली आहे.
म्हाडा मुख्यालयाची इमारत उभारल्यापासून अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आलेली नव्हती. आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था केली होती; मात्र ही सुविधा आग नियंत्रणासाठी पुरेशी नसल्याने मुख्यालयात अग्निशमन यंत्रणा बसवण्याची नोटीस अग्निशमन दलाने म्हाडा प्रशासनाला दिली होती. याचदरम्यान सरकारी कार्यालयात आगी लागण्याच्या घटना वाढीस लागल्याने अग्निशमन दलाने पुन्हा म्हाडा प्रशासनाला नोटीस बजावत अग्निशमनविरोधी यंत्रणा बसवण्याची सूचना केली होती; मात्र म्हाडा मुख्यालय इमारत जीर्ण झाली असल्याने तिचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार म्हाडा मुख्यालयाचा पुनर्विकास करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे गृहनिर्माण विभागाने म्हाडा मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला आहे. इमारतीच्या पुनर्विकासाची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सध्या असलेल्या कार्यालयातूनच म्हाडाच्या चार मंडळांचा कारभार सुरू आहे. येथे येणारे नागरिक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी म्हाडाने अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06877 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..