यंदाचा ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ २१ फूट उंचीचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाचा ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ २१ फूट उंचीचा!
यंदाचा ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ २१ फूट उंचीचा!

यंदाचा ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ २१ फूट उंचीचा!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. सुरुवातीला महाराष्ट्रापुरता सीमित असलेला गणेशोत्सव आता देशभर आणि त्याही पुढे जाऊन सातासमुद्रापलीकडे पोहचला आहे. ऑस्ट्रेलियातील ॲडलेड शहरात साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातील प्रमुख उत्सव मानला जातो. विशेष म्हणजे लालबागहून तिथे गणेशमूर्ती पाठवली जाते. यंदाही तब्बल २१ फुटांची मूर्ती लालबागमध्ये साकारण्यात आली असून उद्या (ता. १३) विधिवत पूजा करून ती ऑस्ट्रेलियाला रवाना केली जाणार आहे. कित्येक हजार मैलाचा प्रवास करून मूर्ती ॲडलेड शहरात पोहोचणार आहे. परदेशात विराजमान होणारी बाप्पाची आजपर्यंतची ही सर्वांत उंच मूर्ती असल्याचे सांगण्यात आले.

ऑस्ट्रेलियात २०१६ मध्ये ‘युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया’ संघटनेने ॲडलेड शहरात गणेशोत्सव सुरू केला. ॲडलेडमधील हा बाप्पा ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ म्हणून नावारूपास आला. मंडळाकडून दरवर्षी मूर्तीची उंची वाढवली जाते. यंदाची राजाची मूर्ती २१ फूट उंच आहे. परदेशातील सर्वांत मोठ्या गणेशमूर्तीचा आगळावेगळा विक्रमही यानिमित्ताने साधला जाणार आहे.

दोन दिवसांचा जंगी उत्सव
ॲडलेड शहरात ३ आणि ४ सप्टेंबर असा दोन दिवस गणेशोत्सव साजरा होणार असून, ऑस्ट्रेलियामधून १५ हजारपेक्षा जास्त भाविक दर्शनाला येतील, असे मंडळाचे भारतातील संपर्कप्रमुख राजेंद्र झेंडे यांनी सांगितले. १६ तासांपेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून ६० पेक्षा जास्त सादरीकरण होणार आहे. भारतासह इतर १० ते १२ देशांचे कलाकारही सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी दिली.

सहा वर्षांची परंपरा
‘लालबागचा राजा’चे मूर्तिकार मनोहर बागवे आणि सदानंद बागवे यांनी पहिली मूर्ती तयार केली होती. ती १२ फूट उंच होती. त्या वेळीही ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ परदेशातील सर्वांत मोठ्या उंचीचा बाप्पा ठरला होता. सहा वर्षांपासून या गणेशोत्सवाची परंपरा अविरत सुरू असून, कोरोना काळातही उत्सवात खंड पडलेला नाही, असे मंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06881 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top